मुंबई :अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत इतर आठ आमदारांनी देखील शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये नाराजी पाहावयास मिळत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवार आणि पक्षाच्या इतर आठ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रवादीने दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सांगितले की, त्यांच्या पक्षाने अजित पवार आणि इतर आठ जणांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. ते म्हणाले की, भारताच्या निवडणूक आयोगाला एक ई मेल देखील पाठवण्यात आला आहे.
आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी केलेली याचिका :सोमवारी पत्रकारांशी बोलताना नार्वेकर म्हणाले की, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी केलेली याचिका मला मिळाली आहे. मी ती काळजीपूर्वक वाचेन. नमूद केलेल्या मुद्यांचा मी अभ्यास करेन आणि याचिकेवर योग्य ती कारवाई करेन. राष्ट्रवादीच्या किती आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे, असे विचारले असता राहुल नार्वेकर म्हणाले की, मला याबाबत माहिती नाही.