नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत, मात्र, अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातं असेल तर फ्री अँड फेअर अशा प्रकारच्या न्याय प्रक्रियेत हे बसत नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष यांची बाजू घेतली.
योग्य निर्णय करतील :विधानसभा स्पीकर कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. अध्यक्ष हे स्वतः अत्यंत निष्ठावंत वकील आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की, जे कायद्यात आहे, संविधानात आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्या नियमाला अनुसरून विधानसभेचे अध्यक्ष योग्य निर्णय करतील. योग्य सुनावणी घेऊन योग्य वेळेत निर्णय देतील, अशी अपेक्षा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
कोणत्या नाकाने नैतिकता सांगतात: मी कालच सांगितलेले आहे, उद्धव ठाकरेंना नैतिकतेविषयी बोलण्याचा अधिकार नाही. ते मोदीजींचे फोटो लावून निवडून आले आणि मुख्यमंत्रीपदाच्या खुर्ची करता पक्षाचे ध्येय धोरण आणि विचारधारा सोडली. ज्यांनी कृती सोडली ते कोणत्या नाकाने नैतिकता सांगतात हे मला समजतच नाही. त्यांना वाटत असेल निकाल त्यांच्या बाजूने आला तर त्यांनी ढोल बडवावे.