मुंबई : सकाळी शरद पवारांच्या सभेला उपस्थित असलेले मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांच्या मेळाव्यानंतर आमदार भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांना पाठिंबा दिला. वाय. बी. चव्हाण केंद्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला भुयार यांनी हजेरी लावली होती. भुयार सकाळी शरद पवारांकडे तर, दुपारी अजित पवारांकडे दिसुन आल्याने चर्चेला उधान आले होते. जवळपास 40 वर्षे काका शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांसोबत पक्षांतर करून एनडीएत प्रवेश केला.
आमदारांसह सरकारमध्ये सहभागी : अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी, पवार कुटुंबात तेढ निर्माण झाली आहे. अजित पवार यांनी 40 आमदारांसह सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवारांसह आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरही दावा केला.
राष्ट्रवादीत बंडखोरी : शिवसेनेतील बंडखोरीनंतर वर्षभरानंतर राष्ट्रवादीत बंडखोरी सुरू झाली. या लढतीत नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आज शरद पवार तसेच अजित पवार दोन्ही गटाची बैठक झाली.दोन्ही गटांकडून व्हीप जारी करण्यात आला. त्यामुळे आमदारांना नेमका कुणाचा व्हिप लागु होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकणाची राज्यात चर्चा सरु आहे. अजित पवार यांना आतापर्यंत 32 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. तर, शरद पवार यांना 18 आमदारांचा पाठिंबा आहे.