महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध..? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा - शिवसेना

राज्यात 21 मे रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत राष्ट्रावादी आणि कॉंग्रेसने प्रत्येकी दोन-दोन जागा मागितल्या आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीच्या या अतिरक्त मागणीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता. मात्र, काँग्रेसने फक्त एक जागा लढविणार असल्याचे आज (शनिवार) जाहीर केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

vidhan bhavan
विधान भवन

By

Published : May 9, 2020, 8:32 PM IST

मुंबई - राज्यात येत्या 21 मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढील पेच टळला आहे.

परिषदेच्या नऊ जागांवर महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस दोन जागांवर लढण्याची तयारी करत होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी शनिवारी (दि. 9 मे) केवळ एकाच उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढील पेच टळला आहे.

येत्या 27 मे पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधी मंडळाच्या परिषद अथवा विधानसभेचे सदस्यत्व मिळणे आवश्यक होते. त्यानुसार घटनात्मक पेच टाळण्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील महाविकास आघाडीने राज्यात परिषदेच्या निवडणूक घ्याव्यात, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपने नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके, धनगर समुदायाचे नेते गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादीतून भाजपात आलेले रणजीतसिंह मोहिते पाटील आणि भाजपच्या डॉक्टर्स सेलचे डॉ.अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि विदर्भातील अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेसकडून माजीमंत्री नसीम खान आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा असतानाच जालन्याचे युवा कार्यकर्ते राजेश राठोड यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणूकीत राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला दोन जागा घेतल्याने या निवडणूकीत एक जागा लढवावी, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये होता. मात्र, काँग्रेसने या निवडणूकीत एकच उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही सोमवारपर्यंत असल्याने महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार आपले उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करणार आहेत. संख्याबळानुसार ज्या उमेदवाराला 29 मते मिळतील त्या उमेदवाराच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार आहे.


सध्या विधानसभेत असणारे पक्षीय बलाबल

भाजप – 105, शिवसेना - 56, राष्ट्रवादी काँग्रेस - 54, काँग्रेस - 44, बहुजन विकास आघाडी – 3, समाजवादी पार्टी – 2, एआयएमआयएम – 2, प्रहार जनशक्ती – 2, मनसे – 1, माकप – 1, शेतकरी कामगार पक्ष – 1, स्वाभिमानी पक्ष – 1, राष्ट्रीय समाज पक्ष – 1, जनसुराज्य पक्ष – 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 1, अपक्ष – 13

हेही वाचा -मुंबईमध्ये स्थलांतरीत कामगारांच्या रेल्वे तिकिटांसाठी 'एक तिकीट माणुसकीचे' मोहीम सुरु

ABOUT THE AUTHOR

...view details