मुंबई- 'महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशन (मसला)' च्यावतीने बुधवारी कालिना कॅम्पसमधील परीक्षा भवन समोर सकाळी १२:३० वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराविरोधात आणि विधी विभागाच्या निकाल दिरंगाई विरोधात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती विद्यार्थी संघटनेचे सिद्धार्थ इंगळे यांनी दिली.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ (Maharashtra Public Universities Act, २०१६), प्रकरण ८ कलम ८९ च्या अनुसार, विद्यापीठ प्रत्येक परीक्षेचे निकाल त्या विशिष्ट पाठ्यक्रमाच्या परीक्षेच्या अखेरच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत किंवा उशिरात उशिरा म्हणजे ४५ दिवसांच्या आत घोषित करणे अनिवार्य आहे. परंतु, असे न होता ६० दिवस उलटून देखील परिक्षांचे निकाल जाहीर न करताच विद्यापीठ प्रशासनाने पुढच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करून टाकल्या आहेत.
गेल्या ४ वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणांमुळे विद्यार्थी विशेषतः विधी विभागाचा विद्यार्थी भरडला जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६, बार कौन्सिल ऑफ इंडिया, लीगल एज्युकेशन रुल २००८ या सगळ्या कायद्यांची पायमल्ली मुंबई विद्यापीठ करत आले आहे. विधी शिक्षणाचे स्टँडर्ड दिवसेंदिवस घसरत चालले आहे.
वेळेत निकाल घोषित करण्यासाठी ३ वर्षापासून मुंबई विद्यापीठाने ऑनस्क्रीन मार्किंग सिस्टिम (OSM) ही नवीन मूल्यांकन पद्धत सुरु केली. परंतु, अनेक तांत्रिक चुका आणि त्रुटी यामुळे ही प्रणाली वेळेवर निकाल घोषित करण्यात अयशस्वी ठरली. उलट १०० दिवस उलटूनही निकाल लागत नाहीत. ही वस्तुस्थिती होती. गेल्या वर्षी नवनिर्वाचित कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी एक मोठा चुकीचा निर्णय घेतला. त्यात एलएलबी ३ वर्षांच्या सेमिस्टर १ ते ४ तसेच एलएलबी ५ वर्षांच्या सेमिस्टर ५ ते ८ मूल्यांकन करण्याची जबाबदारी पूर्णतः स्वतंत्रपणे महाविद्यालयांना सोपवण्यात आली खरी. परंतु महाविद्यालय ही जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलेले आहेत. यावरून स्पष्ट होते, की मुंबई विद्यापीठ कायदाच्या(विधी) कोर्सला समजण्यात कमी पडत आहे.
भांडवलदारंच्या हाताचे बाहुले बनून विद्यार्थ्यांना देशोधडीला लावणारे मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि त्यांना पाठीशी घालणारे राज्य सरकार यांचा जाहीर निषेध करण्यासाठी व खालील मागण्या मान्य करून घेण्यासाठी उद्या ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या -