मुंबई -रेल्वे गाड्या, रेल्वे स्थानके, तसेच रेल्वे परिसरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलेला आहे. मागील तीन वर्षांत लोहमार्ग पोलिसांकडून तब्बल पावणे 2 लाख 97 हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. 2017 ते 2019 पर्यंत 1 लाख 31 हजार 332 गुन्ह्यांची नोंद एकट्या महाराष्ट्रात नोंदवली आहे. त्यामुळे, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा -74 वर्षीय रिक्षावाल्याची कहाणी व्हायरल, क्राऊड फंडिंगमधून मिळाली 24 लाखांची मदत
अशी आहे आकडेवारी
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) वार्षिक अहवालानुसार 2017 मध्ये संपूर्ण देशभरातील जीआरपीने 99 हजार 566, 2018 मध्ये 1 लाख 7 हजार 92 आणि 2019 मध्ये 99 हजार 710 गुन्हांची नोंदणी केल्याचे समोर आले आहे. या मध्ये 1 लाख 31 हजार 332 गुन्ह्यांच्या नोंदीसह पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र, तर 32 हजार 355 गुन्ह्यांच्या नोंदीसह दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर 19 हजार 313 गुन्ह्यांच्या नोंदीसह मध्य प्रदेश आहे.
35 टक्के गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात
देशभरात रेल्वेमध्ये होणाऱ्या गुन्ह्यांची टक्केवारी इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात 35 टक्के आहे. 2019 मध्ये राज्यात 44 हजार 159 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे. लोहमार्ग पोलिसांकडून दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात दरवर्षी वाढ होत चाललेली आहे. राज्यात तुलनेने रेल्वेचे जाळे कमी असले, तरी घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. नुकतेच लोकसभेत रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे. ज्यात 2020 मध्ये 17 हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर 2019 मध्ये 56 हजार 502 आणि 2018 ला 55 हजार 780 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.