मुंबई -मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेतील सदस्यांच्या नावांचा आणि निवडीचा विषय दोन दिवसांत मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या 12 सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सादर करणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठांचे सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधानपरिषद सभागृहात कलावंत, साहित्यिकांची अनेक मांदियाळी अवतरणार आहे.
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा या जून 2020पासून जागा रिक्त आहेत. या जागांसाठी मागील काही दिवसांत अनेकांच्या नावांची चर्चा सुरू असली तरी यामध्ये सर्वच पक्षांकडून साहित्यिक, कलावंत आणि विविध क्षेत्रातील योगदान दिलेल्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते. यावर मंगळवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात कलावंताची वर्णी लागण्याची चर्चा सुरू झाली आहे.
- संभाव्य नावे
लोकगायक आनंद शिंदे-
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या चार सदस्यांच्या कोट्यातून मंगळवेढ्याचे सुपूत्र असलेले प्रख्यात लोकगायक आणि आंबेडकरी चळवळीचे गायक आनंद शिंदे यांचे नाव कलावंताच्या कोट्यातून निश्चित केले आहे. यासाठी दलित मतदारांमध्ये पाया विस्तारण्यासाठी शिंदे यांची राष्ट्रवादीला मोठा फायदा होऊ शकतो.
शेतकरी नेते राजू शेट्टी -
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे राष्ट्रवादीला वेळोवेळी पाठबळ मिळालेले आहे. यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना सहयोगी पक्ष म्हणून ही संधी दिली जाणार आहे.
धनगर समाजाचे नेते यशपाल भिंगे -
धनगर समाजाचे नेते यशपाल भिंगे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक आणि साहित्याच्या क्षेत्रात भिंगे यांचे योगदान असून धनगर समाजामध्ये त्यांचे मोठे नाव आहे. यामुळे त्यांची राष्ट्रवादीकडून वर्णी लागू शकते.
साहित्यिक पार्थ पोळके -
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक पार्थ पोळके यांच्या नावाची मागील सहा महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. पोळके हे पुरोगामी विचाराचे आणि आपल्या संशोधनाचा एक दबदबा निर्माण करणारे संशोधक म्हणूनही ओळखले जातात. शिवाय फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील ते मोठे कार्यकर्तेही आहेत. यामुळे त्यांना राष्ट्रवादीकडून संधी दिली जाण्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून पोळके यांच्या नावाचा विचारही करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
एकनाथ खडसे -
मागील ४० वर्षे भाजपाची पाळेमुळे गावांपर्यंत रुजविणारे आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचेही नाव राष्ट्रवादीकडून निश्चित असल्याचे सांगण्यात येते.
गायक अनिरुद्ध वनकर -
काँग्रेसने आपल्या वाट्याला येणाऱ्या 4 जागांच्या कोट्यातून विदर्भातील गायक- संगीतकार अनिरुद्ध वनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्राकडून देण्यात आली. वनकर हे आंबेडकर चळवळीतून पुढे आलेले कलावंत असून त्यांचा काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो.