मुंबई- भारत-चीनच्या सीमेवरील गलवान येथे दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली होती. यात भारताच्या तब्बल २० जवानांना वीरमरण आले. मात्र, याचवेळी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' या उपक्रमातंर्गत महाराष्ट्रात चीनकडून मोठी गुतंवणूक करण्यात आली होती. सीमेवर भारतासोबत वेगळी वागणूक आणि व्यवहाराचा मुद्दा आला की महाराष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण गुंतवणूक करार, अशा दोन पातळ्यांवर चीनची वागणूक दिसत आहे. मात्र, आता चीनसोबतच्या या करारांना स्थगिती देण्यात आली आहे. सीमेवर चीनसोबत भारतीय सैन्यात चकमकी सुरू असताना 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' 2.0 नुसार चीनी कंपन्यांसोबत 5 हजार 20 कोटींचे करार करण्यात आले होते.
भारत चीन सीमेवर 20 भारतीय सैनिकांना वीरमरण आल्यानंतर देशभरात चीनच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात चीनचा विरोध केला जात असून चीनसोबत व्यवहार करू नयेत, अशी भूमिका नागरिक मांडत आहेत. राष्ट्रीय पातळीवरही चीनसोबत झालेले करार रद्द करण्यात येत आहेत. मेरठ मेट्रोचे सिग्नल यंत्रणेचे चीनला दिलेले कंत्राटदेखील रद्द करण्यात आले आहे. तर मुंबईतील मोनो रेलच्या कामाचे कंत्राटही एमएमआरडीएने रद्द केले आहे.
'या' चिनी कंपन्यांसोबतच्या करारांना ठाकरे सरकारकडून स्थगिती -
१) हेंगली (चीन) इंजिनिअरिंग - तळेगाव टप्पा क्रमांक -2, पुणे 250 कोटी आणि 150 रोजगार
२) पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो - तळेगाव 1000 कोटी रोजगार 1500
३) ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव - पुणे 3770 कोटी आणि रोजगार 2042
भारतीय आणि जागतिक कंपन्यांनी मिळून महाराष्ट्रात 16 हजार कोटींचे गुंतवणूकीचे करार केले आहेत. एकट्या चीनने 5020 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील तळेगावत केली आहे. एकीकडे सीमेवर भारत आणि चीन मध्ये तणाव वाढला असून धुमश्चक्रीसुद्धा झाली आहे. याच तणावाच्या स्थितीत महाराष्ट्र सरकारने चीनच्या कंपन्यांशी करार करू नयेत. केंद्राच्या आदेशानुसारच हा व्यवहार व्हावा तसेच पुढील आदेश येत नाहीत तोपर्यंत या कराराला स्थगिती द्यावी, असे निर्देश केंद्राने दिले असल्याचे उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत अधिकृत भूमिका मांडलेली नाही. या कराराला केंद्राने स्थगित देण्याचे निर्देश दिले असल्याचे राज्याच्या गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनामुळे जगातील व्यवहार ठप्प पडले आहेत. राज्याला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा प्रारंभ केला असून हे करार पूर्णत्वाला जातील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले होते. मात्र केंद्राच्या निर्देशामुळे महाराष्ट्रातील चीनी कंपन्यांसोबतचे करार रद्द करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सामंजस्य करार झालेल्या कंपन्यांमध्ये चीनच्या हेंगली (चीन) इंजिनिअरिंग या कंपनीच ही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये ही कंपनी 250 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. असेच यात 150 लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता होती.
तसेच ग्रेट वॉल मोटर्स ऑटोमोबाईल ही कंपनी तळेगावात सर्वाधिक तब्बल 3770 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. यात 2042 लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. ग्रेट वॉल मोटर्स ही कंपनी भारतात प्रामुख्याने एसयूव्ही प्रकारच्या वाहनांची निर्मिती करणार होती. त्याचबरोबर पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ऑटो ही कंपनी सोबत 1000 कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. या प्रकल्पातून 1500 जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात अली होती. तळेगाव औद्योगिक विकास महामंडळाच्या इंडस्ट्रियल पार्कमध्ये 300 एकराच्या जागेत हे प्रकल्प उभारले जाणार होते. यात मुख्य प्रकल्प, संशोधन केंद्र आणि कार्यालयांचे नियोजन चीनी कंपन्यांनी केले होते.