मुंबई- प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. यामध्ये मुंबईच्या झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. झेन सदावर्ते हिने तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून 17 जणांची सुखरूप सुटका केली होती.
डोळ्यापुढे धूर.. गुदमरणारा श्वास..अन् आक्रोश.. 'झेन'ने सांगितला आगीचा थरार - zen sadavarte news
मुंबईच्या झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. झेन सदावर्ते हिने तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून 17 जणांची सुखरूप सुटका केली होती.
झेन सदावर्ते ही मुंबई उच्च न्यायालयातील वकील अॅड. गुणरतन सदावर्ते यांची मुलगी आहे. गेल्यावर्षी 22 ऑगस्ट 2018 ला सकाळी मुंबईतील परळ येथील क्रिस्टल टॉवर या 17 मजली इमारतीला आग लागली. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर 16 जण जखमी झाले होते. 16 व्या मजल्यावर राहणाऱ्या झेनच्या घरातही आगीचा धूर पसरला. ते बघूनच झेनची आई घाबरली आणि टाहो फोडून रडू लागली. त्या आवाजाने झेनची झोप मोडली आणि ती खडबडून जागी झाली. तिने आसपास बघितले आणि काय झाले आहे त्याचा अंदाज घेतला. दार उघडले तर समोरच्या जिन्यातून धूर येत होता. जवळ वास्तव्य करणारे शेजारी सैरावैरा पळत आक्रोश करत होते, अशा वेळी झेनने न घाबरता 17 जणांचे प्राण वाचवले.
या साहसाकरिता तिला ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ती सध्या पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्ली येथे गेली आहे. शाळेत शिकलेली गोष्ट आपण अंमलात आणून सर्वांचे प्राण वाचवले होते, असे झेनने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.