मुंबई- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सायबर विभागाने कडक पावले उचलली असून राज्यात ११३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी सोशल मीडियाबाबत अधिक सतर्क राहून महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन सायबर विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाकडून लॉकडाऊनच्या काळात ११३ गुन्हे दाखल - सायबर विभागाकडून लॉकडाऊनच्या काळात ११३ गुन्हे दाखल
महाराष्ट्र सायबर विभागाकडून लॉकडाऊनमध्ये राज्यातील विविध शहरात ११३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईसह पुण्यासारख्या प्रमुख शहरातील गुन्हागारांवर सायबर गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर सायबर विभाग समन्वय साधून काम करत आहे. सद्या सायबर विभाग टिक-टॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवून आहे.
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ६ एप्रिल २०२० पर्यंत ११३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये बीड १५, पुणे ग्रामीण ११, मुंबई ९, सातारा ७, जळगाव ७, नाशिक ग्रामीण ६, नागपूर शहर ४, नाशिक शहर ४, ठाणे शहर ४, नांदेड ४, गोंदिया ३, भंडारा ३, रत्नागिरी ३, जालना ३, परभणी २, अमरावती २, नंदुरबार २, लातूर १, नवी मुंबई १ यांचा समावेश आहे.
कोणी अनोळखी व्यक्तीकडून किंवा व्हाट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणारे आणि समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ, फोटो, मॅसेज तुम्हाला येत असतील तर त्यांची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी. तसेच अशा प्रकारचे व्हिडिओ, फोटो, मॅसेजेस फॉरवर्ड करु नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.