मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून संसर्गाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. महाराष्ट्रात 7 किंवा 14 दिवसांच्या टाळेबंदीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना कृती दलाच्या सदस्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीनंतर टाळेबंदीबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये एक कोटीचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत राज्यात 1 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत 1 कोटी 38 हजार 421 जणांना लस देण्यात आली आहे.
मुंबईत आज 9,989 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात आज सात हजार बाधितांचा टप्पा ओलांडला असून दिवसभरात 7,201 बाधित सापडले आहेत. 63 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3,240 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडिसीवीर औषधाचा राज्यात काही ठिकाणी काळा बाजार होत असल्याचे समोर आले आहे. रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोन जणांना ठाणे खंडणी पथकाने रेमडेसिवीरचा विकताना तीन हात नाका येथून अटक केली आहे. ठाणे खंडणी पथकाने अटक केलेल्या दोघांकडून 21 रेमडेसिवीरचा हस्तगत केले आहेत. हे दोघे आरोपी 5 ते 10 हजार रुपयांमध्ये रेमडेसिवीरचा विकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच नाशिकमध्ये नकली रेमडेसिवीर औषधाची विक्री होत असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे कोरोनाग्रस्तांचे नातेवाईक हतबल झाल्याचे चित्र सध्या पुण्यात दिसत आहे. मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुुटवडा निर्माण झाला आहे. तासनतास रांगेत थांबूनही हे इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत.