मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे आता त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. काँग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांना पक्षातून निलंबित केले आहे. कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीने ही कारवाई केली आहे. तसेच आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा : काँग्रेसचे नागपूरचे माजी आमदार आशिष देशमुख हे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. तेव्हापासूनच त्यांच्या निलंबनाची चर्चा सुरू होती. आशिष देशमुख हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा असतानाच अखेर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत आशिष देशमुख यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेतला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक : मुंबईत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीची बैठक झाली. या बैठकीत आशिष देशमुख यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटिशीला देशमुख यांनी तीन दिवसात उत्तर द्यावं, असे निर्देश शिस्तपालन समितीने दिले आहेत. या नोटीसीचे उत्तर येईपर्यंत ते काँग्रेसमधून निलंबीत असतील.