मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारची फूट पडणार नसल्याचे वारंवार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेस पक्षात दोन गट पडले. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी अनेक महिन्यापासून एक गट सक्रिय होता. गेल्या दोन महिन्यापासून मात्र काँग्रेसमधील वातावरण शांत दिसल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेस पक्षाकडून वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बैठक 14 जुलै रोजी होणार होती, मात्र ती बैठक आज होणार आहे. दिल्लीतील पक्ष कार्यालयात 11 वाजता बैठकीला सुरवात होणार आहे.
विरोधी पक्ष नेते पदावर शिक्कामोर्तब :महाराष्ट्र विधिमंडळ विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेस पक्षाचा दावा असण्याची शक्यता आहे. कारण की विधानसभेतील आमदारांची संख्या काँग्रेसकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे विरोधीपक्ष पक्षनेता काँग्रेसचाच हवा, असा सूर काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी लावल्याचे दिसते. विरोधीपक्ष नेतापदाच्या नावावर आज दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब होईल. विजय वडेट्टीवार यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेता पदावर बसवल्यास काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी रोखण्यास मदत होणार आहे.