मुंबई -आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड येथील तळये गावाचा दौरा केला. यावेळी त्यांनी पुरग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 'तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचे पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल', अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.
स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली माहिती -
दरम्यान, आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मुख्यमंत्री तळीये गावात पोहोचले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री भरपावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - 2019च्या पुरादरम्यान जनादेश यात्रा निघाली होती; मात्र ही राजकारणाची वेळ नाही - नाना पटोले