मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते राहील.
तिढा सुटला पण पेच कायम? :अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागामुळे खाते वाटपाचा तिढा सुटत नव्हता. मात्र सोमवार १७ जुलैपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने त्यापूर्वी खातेवाटप होणे गरजेचं होतं. खातेवाटपानंतर अनेकांची लॉटरी लागली आहे, तर अनेक मंत्री नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता नाराज असलेल्या मंत्र्यांची नाराजी मुख्यमंत्री कसे दूर करतात हे बघणे महत्त्वाचे आहे.
26 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे :
- छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- दिलीप वळसे पाटील – सहकार
- राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
- सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
- हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
- चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
- विजयकुमार गावित - आदिवासी विकास
- गिरीष महाजन - ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
- गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता
- दादा भुसे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
- संजय राठोड - मृदा व जलसंधारण
- धनंजय मुंडे - कृषि
- सुरेशभाऊ खाडे - कामगार
- संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन
- उदय सामंत - उद्योग
- तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
- रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
- अब्दुल सत्तार - अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
- दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा
- धर्मरावबाबा आत्राम – अन्न व औषध प्रशासन
- अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
- शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क
- अदिती तटकरे – महिला व बालविकास
- संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
- मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
- अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.