मुंबई - गडचिरोली येथील नक्षली हल्ला आणि दुष्काळी उपाययोजनांसाठी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली. आज (गुरुवार) ११ वाजता ही बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत गडचिरोली हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. बैठक पार पडल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना झाले आहेत.
नक्षली हल्ला आणि दुष्काळी उपाययोजनांसाठी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठकीनंतर मुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावर रवाना
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री रवाना झाले असून पोलीस महासंचालकांसोबत चर्चा करून यावर या घटनेबाबत योग्य ती पाऊले उचलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र दिनी झालेला नक्षली हल्ला आणि दुष्काळी उपाययोजनांसाठी आज (गुरुवारी) राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले. नक्षल हल्ल्यानंतरच्या प्रत्येक घटनाक्रमावर सरकारचे लक्ष असून पोलीस महासंचालक मुंबईत परतल्यांतर त्यांच्याशी प्रदिर्घ चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवाय दुष्काळी भागातील चारा छावण्या, पाणी टँकर आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी सरकार तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाला पत्र पाठवून राज्यातील निवडणुका संपल्याने आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली होती. दुष्काळ निवारणासाठी विविध कामांचे टेंडर काढण्यासाठीही निवडणूक आयोगाची परवानगी मागण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून येत्या दोन दिवसांत ही परवानगी मंजूर होणे अपक्षीत आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीत तातडीच्या उपाययोजना राबवण्यासाठी पालकमंत्र्यांनी परिस्थिचा आढावा घेणे गरजेचे असल्याने निवडणूक आयोगाच्या परवानगीची वाट न पाहता मी आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.