मुंबईCabinet Meeting Today : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक होत आहे. या बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना विरोध केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र ( Maratha Reservation ) दिल्यास सरकार जाईल, असा थेट इशारा दिला आहे. तर मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळांवर टीका केली आहे. त्यामुळे आजची मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
मराठा आरक्षणावरुन दोन मंत्री आमने-सामने :मनोज जरांगे-पाटील यांनी जालन्यात दोन टप्प्यात उपोषण केलं. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, ते घटनाबाह्य ठरेल असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ओबीसीतून आरक्षण दिल्यास सरकार जाईल, असा इशारा सरकारमधीलच मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे. यानंतर पत्रकार परिषद घेऊन मंत्री शंभूराज देसाई यांनी भुजबळांवर टीका केली. छगन भुजबळांनी संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य करू नये, असं स्पष्ट केलं होतं. यानंतर सरकारमध्येच समन्वय नसल्याचं दिसून आलं आहे. या सर्व घडामोडीनंतर आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक होत आहे. या बैठकीत या वादावर देखील चर्चा होणार आहे.