मुंबई -शिवसेनेला ( ठाकरे गट) लोकसभा निवडणुकीत २३ जागा दिल्या तर आमचं काय? असा प्रश्न काँग्रेसचे नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रीय नेत्यांबरोबर आमचं बोलणं सुरू आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ते निर्णय घेणारे आहेत. त्यांच्याबरोबर आमचा संवाद व्यवस्थितपणे सुरू आहे. मग, आम्ही किती जागा लढणार ते किती जागा लढणार याचा निर्णय दिल्लीतील नेते घेणार आहेत. इथे गल्लीबोळातील नेते बडबड करत आहेत. त्यांची बडबड कोण ऐकणार, असा अप्रत्यक्ष टोलाही संजय राऊत यांनी काँग्रेस नेते संजय निरुपम यांना लगावला आहे.
काँग्रेसला शून्यापासून सुरुवात करायची-आम्ही नेहमी महाराष्ट्रमध्ये लोकसभेच्या २३ जागा लढत आलो आहोत. दादरा नगर हवेलीही सुद्धा एक जागा आम्ही लढवतो, या जागा कायम राहतील. यापूर्वीच आमची चर्चा झाली आहे. तेव्हा ज्या जागेवर विद्यमान खासदार निवडून आले आहेत. त्याविषयीनंतर चर्चा केली जाईल, असं ठरवलं होतं. अशा अनुषंगाने काँग्रेसची एकही जागा महाराष्ट्रामध्ये नाही. त्यामुळे काँग्रेसला शून्यापासून सुरुवात करायची आहे. तरीसुद्धा काँग्रेस महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असल्यानं राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्रित निवडणुकीला सामोरे जातील. म्हणून जागा वाटपाबाबत इतर लोक जे बडबड करतात त्यांच्यावर लक्ष द्यायची गरज नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
प्रकाश आंबेडकर यांची साथ महत्त्वाची-प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीबरोबर सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांची भूमिका या देशातून हुकूमशाही नष्ट करायची अशी आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मांडत आहेत. आम्हीसुद्धा तीच भूमिका मांडत आहोत. यामध्ये मतभेद असण्याचं काही कारण नाही. या पद्धतीचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होऊन ते वनवासात जातील. असं कृत्य करू नका, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. परंतुअयोध्येतील राम मंदिरउद्घाटनासाठी उद्धव ठाकरे यांना आमंत्रण आले आहे की नाही? यावर संजय राऊत यांनी काही बोलण्यास नकार दिला.
राममंदिर उद्घाटनासाठी आम्ही आमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही. हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे. ती काही १५ ऑगस्टची परेड नाही आहे. अथवा २६ जानेवारीचा प्रजासत्ताक सोहळा दिन नाही. खरं म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम अयोध्येत असायला हवा होता-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत