मुंबई -सारथी आणि महाज्योतीमध्ये काही एकाच जाती प्रवर्गातील विद्यार्थी समान येत असल्याने लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी दोन्ही संस्थाकडून शिष्यवृत्तीचा लाभ उचलल्या जात असल्याची बातमी ईटीव्ही भारतने प्रकाशित केली होती. त्यानंतर यामधील घोळ दूर करत समान जात कोणत्याही एकाच संस्थेत ठेवा व राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये उडालेला गोंधळ दूर करा, अशी मागणी विद्यार्थी वर्गाने केली होती. याची दखल घेत ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (महाज्योती)ने दोन शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा रक्कम परत पाठविण्याचे पत्र पाठविले आहेत.
'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केले होते वृत्त
देशातील सर्वात महत्त्वाच्या आणि आव्हान मानल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेमध्ये राज्यातील उमेदवारांचे प्रमाण वाढविण्यासाठी गुणवत्ताधारित विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. तसेच यूपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विविध जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्यातील बार्टी, तारर्ती, सारथी, महाज्योती अशा चार संस्थांकडून शिष्यवृत्ती दिली जाते. अलिकडे संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विविध जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी आर्थिक मदत करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ने विद्यार्थ्यांकडून मुलाखतीस पात्र उरलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते. दोन्ही संस्थांनी जवळपास ११७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती जाहीर केली. यापैकी दहा विद्यार्थ्यांनी दोन्ही संस्थाकडून मदत घेतल्याची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केली होती. त्यामुळे, सारथी आणि महाज्योतीच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याची दखल घेत आता दोन्ही संस्थांनी विद्यार्थ्यांकडून स्पष्टीकरण मागविले. तर महाज्योतीने या दहाही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा रक्कम परत पाठविण्याचे पत्र पाठविले आहे.
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती रक्कम केली परत
स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष उमेश कोर्राम यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (महाज्योती) योग्यरीतीने तपासणी न करता एकाच योजनेसाठी दोनदा अर्थसहाय्य केले जात आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे ही संस्थाने आर्थिक साहाय्य घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मदत देत आहे. एक जाती प्रवर्गात विद्यार्थीला सारथी आणि महाज्योती अशा दोन्ही संस्थेचा लाभ कायम असल्यामुळे हा घोळ निर्माण झालेला होता. हा घोळ दोन्ही संस्थेला लक्षात आल्यानंतर आता दोन्ही संस्थेकडून शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्र पाठवून शिष्यवृत्तीची रक्कम परत पाठविण्याचे पत्र पाठविण्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी ही रक्कम परत केली आहे. मात्र, या दोन्ही संस्थेचा वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे हा घोळ निर्माण झालेला होता. युपीएससीची मुख्य परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखतीची प्रतीक्षा ऑगस्ट महिन्यापासून आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नयेत, यासाठी आता संस्थांकडून काळजी घेणे गरजेचे आहे.
काय होते पत्र?
सारथी आणि महाज्योती या दोन्ही संस्थेकडून शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्योतिबा फुले संशोधन व प्रशक्षिण संस्थेकडून पत्र पाठविण्यात आले आहेत. या पत्रात, एकाच बाबीसाठी व उद्देशाकरिता शासनाकडून दोनदा आर्थिक लाभ घेणे हे चुकीचे व शासनाची जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे आहे. ही बाब अतिशय गंभीर असून आपली ही कृती कठोर कारवाईस पात्र ठरते. आपण घेतलेले २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य तत्काळ आणि विनाविलंब परत करण्याचे आवाहन महाज्योतीकडून करण्यात आलेले होते आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा विनाविलंब पैसे परत केले आहे.
'आमची काही चूक नाही'
आम्ही युपीएससीच्या मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेला आहोत. आता मुलाखतीची तयारी करत आहे. त्यात हा घोळ झाल्यामुळे आमच्या अभ्यासावर परिणाम पडत आहे. विशेष म्हणजे, महाज्योतीमध्ये इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमाती, तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांचा, तर सारथीमध्ये मराठा, मराठा-कुणबी, कुणबी या समुदायाचा समावेश होतो. मात्र, यातील काही जाती प्रवर्ग समान आहे. मात्र याठिकाणी वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे हा घोळ सुरू आहे. आमची यात कोणतीही चूक नसून सारथी आणि महाज्योतीने हा घोळ करून ठेवला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पद्धतीने अर्ज केला आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांनी गंभीर विचार करून कोणती जात कोणत्या संस्थेत ठेवायची यावर योग्य निर्णय घ्यावा, अशी माहिती ईटीव्ही भारताला नाव न छापण्याचा अटीवर एका विद्यार्थ्यांनी दिली आहे.
हेही वाचा -...अन् त्याने आईसाठी साकारले पिरॅमीड आकाराचे आकर्षक घर