मुंबई Mahadev Betting App Case : महादेव अॅप सट्टेबाजी घोटाळ्यात स्टायलिश अभिनेता साहिल खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासह मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांचा 15 हजार कोटींच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. ईडीनं 2018 मध्ये प्रदीप बर्मन यांची 20 कोटी 87 लाखांची संपत्ती जप्त केली.
साहिल खान, मोहित बर्मनसह 32 आरोपींची नावं : न्यायालयाच्या आदेशानुसार माटुंगा पोलिसांनी तक्रारदार प्रकाश बनकर यांचा जबाब घेऊन एफआयआर नोंदवला आहे. महादेव अॅपची उपकंपनी असलेल्या खिलाडी अॅपच्या प्रवर्तकासह उद्योगपती मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांच्यासह 32 आरोपींची नावं या गुन्ह्यात समाविष्ट आहेत. आरोपी क्रमांक 32 वर "इतर अज्ञात व्यक्ती" असं नमूद करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकार्याच्या म्हणण्यानुसार, यामुळे देशातील इतर प्रमुख व्यक्तींची चौकशी करण्याची व्याप्ती वाढणार आहे. सध्या छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान बेटिंग घोटाळ्यानं लक्ष वेधलं आहे. महादेव अॅप घोटाळ्यातील कथित सहभागावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बघेल यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
अभिनेता रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आणि हुमा कुरेशींची झाली चौकशी :कुर्ला न्यायालयाच्या निर्देशानुसार खिलाडी अॅप विरोधात 7 नोव्हेंबरला माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. "2019 पासून ऑनलाइन बेटिंग अॅप्सद्वारे आतापर्यंत अंदाजे 15 हजार कोटींची फसवणूक करण्यात आली आहे, असा या एफआयआरमध्ये माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी आरोप केला होता. अंमलबजावणी संचालनालयानं आरोपपत्रात 14 जणांची नावं दिली आहेत. यात कथित अॅप प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल आणि इतर आरोपी विकास छपरिया, चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर, अनिल दममानी, सुनील दममानी, विशाल आहुजा आणि धीरज आहुजा यांचा समावेश आहे. बॉलीवूड अभिनेते रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आणि हुमा कुरेशी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. एफआयआरमध्ये गौरव आणि मोहित बर्मन यांची नावं आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची चौकशी केली जाईल, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
मॅच फिक्सिंगमध्ये बजावली भूमीका :एफआयआरमध्ये मुंबईस्थित आरोपी मोहित बर्मन, दिनेश खंभाट, रोहित कुमार, मुर्गाई आणि गौरव बर्मन यांच्यात संबंध असल्याचं सिद्ध झालं आहे. ते थेट क्रिकेट लीगमध्ये सहभागी होणाऱ्या संघटनांमध्ये थेट इक्विटी खरेदी केलेली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे, ते प्लेअर बुकिंग वेबसाइट नियंत्रित आणि ऑपरेट करतात, असा आरोप आहे. लीगमधील क्रिकेट सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंगच्या गुन्हेगारीत गुंतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मोहित हे डाबर इंडिया लिमिटेडचे चेअरमन आहेत. एफआयआरमध्ये असेही नमूद केलं आहे, की आरोपी सौरभ चंद्राकर हे अनेक प्रभावशाली व्यक्तींशी आणि काँग्रेसशी संबंधित राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. चंद्राकर यांनी मॅच फिक्सिंगमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे बर्मन यांच्या भूमिकेची चौकशी केली जाईल, असा उल्लेख आहे.