मुंबई -बदली, पोस्टिंग प्रकरणात पोलिसांच्या पथकाने माझे जबाब नोंदवले. मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार हे प्रकरण बाजूला सारत होते. मी या प्रकरणाचा व्हिसलब्लोअर आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच मुंबई पोलीस मला सहआरोपी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असा आरोपही त्यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यासंबंधी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या ( Mumbai Police Cyber Crime Branch ) पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी शुक्रवारी नोटीस बजावली. त्यानुसार, फडणवीस हे रविवारी बीकेसीच्या सायबर पोलीस ठाण्यात जबाब नोंदविणार होते. मात्र, काही तासातच कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी त्यांना इथे न येता ते स्वतः त्यांच्या सहकारी शासकीय निवासस्थान 'सागर' बंगला येथे येऊन जबाब नोंदवतील असे सांगण्यात आले. यानुसार पोलीस पथकाने देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवल्यावर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली.
याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी मागच्या वर्षी २३ मार्च २०२१ रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली होती व त्यामध्ये महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला होता. या संबंधीची कागदपत्र त्यांनी केंद्रीय गृहसचिव यांच्याकडे सादर केली होती. या संबंधित प्रकरणांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे हा तपास देण्यात आला होता. या प्रकरणांमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट असल्याकारणाने मी हे प्रकरण केंद्रीय गृहसचिव यांच्याकडे दिले. मात्र, या प्रकरणाची फाइल सहा महिने राज्य सरकारने दाबून ठेवल्यानंतर आता त्यांना या प्रकरणाविषयी जाग आलेली आहे.
मी कुठल्याही प्रकारे ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट गोपनीयतेचा भंग केलेला नाही. कारण या संबंधांमध्ये या अगोदर मुंबई सायबर सेल कडून मला जी प्रश्नावली पाठवण्यात आली होती व आज जे प्रश्न त्यांनी विचारले आहेत त्यामध्ये मोठी तफावत असून ऑफिशियल सीक्रेट एक्स भंग केल्याप्रकरणी मला सहआरोपी करण्यासाठी ते प्रयत्नात आहेत असंही देवेंद्र फडणवीसस यांनी सांगितलं.
कुठल्याही प्रकारे विशेषाधिकाराचे उल्लंघन केलेले नाही.
वास्तविक या संबंधांमध्ये मंत्री नवाब मलिक यांच्या वर कारवाई व्हायला हवी कारण ही सर्व कागदपत्र त्यांनी पत्रकारांना दिली असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केला. या पूर्ण प्रकरणावर बोलताना आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माजी मुख्यमंत्र्यांनी ऑफिशियल सीक्रेट ऍक्टच उल्लंघन केलं असून त्याचप्रमाणे त्यांनी विशेषाधिकाराच उल्लंघन केल्याचं सांगितलं आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी कुठल्याही प्रकारे विशेषाधिकाराचे उल्लंघन केलेल नाही. तर या पूर्ण प्रकरणात मला गोवण्यात आलेल आहे. कारण माझे विशेषाधिकार मला माहित असून मी त्या पद्धतीने वागलो आहे. म्हणून आता हे सर्व पुरावे मी सीबीआयकडे देणार आहे असेही ते म्हणाले.