मुंबई : OLX अॅपवर तक्रारदार यांनी त्यांचा oneplus कंपनीचा मोबाईल फोन विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहीरात दिल्यानंतर फसवणूक झाली आहे. जानेवारीला तक्रारदार यांनी olx या अॅपवर त्यांचा oneplus कंपनीचा मोबाईल फोन विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहीरात दिली होती. २ फेब्रुवारीला यातील आरोपी इसमाने तक्रारदार यांना त्यांचा मोबाईल घेण्यासाठी तो इच्छुक असल्याबाबतचा संदेश पाठवला. त्यानंतर तक्रारदार, आरोपी यांचे olx या अॅपवर मोबाईल संदर्भात मेसेजव्दारे बोलणे झाले.
फोन केला लंपास :तक्रारदार यांनी त्यांचा मोबाईल फोन ३५ हजार रुपयांना विकण्यास इच्छुक असून आरोपीने तो घेण्यास तयारी दर्शवली. नंतर आरोपीने तक्रारदार यांना २ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता व्होकार्ड हॉस्पीटल, नायर हॉस्पीटल रोड या ठिकाणी बोलाविले. ठरल्याप्रमाणे आरोपी इसम तेथे आला. आरोपीने यावेळी हेअर नेट कॅप आणि मास्क परिधान केला होता. आरोपीने तक्रारदार यांच्या मोबाईलची पहाणी करुन फोन त्यांना त्यांचा पत्नीसाठी पाहिजे असल्याची बतावणी करून ती सध्या व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे सांगितले. त्यानंतर, आरोपीने पत्नीला मोबाईल फोन दाखवावा लागेल आणि त्यानंतर पैसे देतो असे सांगून मुळ खरेदी पावती, मोबाईल घेऊन हॉस्पीटलच्या आत गेला. तो पुन्हा परतलाच नाही. तक्रारदार यांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता तो बंद असल्याचे समजले. या घटनेबाबत तक्रारदार यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार भारतीय दंड संविधान कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.