महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लक्षवेधी लढती: राज्यातील 'या' दिग्गजांना बसला पराभवाचा धक्का

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लढतीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राजू शेट्टी, चंद्रकांत खैरे, निलेश राणे, अनंत गीते, प्रिया दत्त यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

लक्षवेधी लढतीत दिग्गज नेत्यांचा पराभव

By

Published : May 23, 2019, 6:43 AM IST

Updated : May 23, 2019, 11:44 PM IST

मुंबई - दिल्लीचं तख्त काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. मात्र, पुन्हा एकदा भाजपने देशासह राज्यात घवघवीत यश मिळवले आहे. यावेळी राज्यातील काही लढती या अत्यंत तुल्यबळ मानल्या जात होत्या. या लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मुख्य लढतीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. मावळमधून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना तर रायगडमधून शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते शिरुरमधून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील, काँग्रेसचे सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, स्वाभिमानीचे राजू शेट्टी,उर्मिला मातोंडकर यांना पराभवचा धक्का बसला आहे. तर औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे पराभूत झाले आहेत.


प्रमुख लढतीत दिग्गजांना पराभवाचा धक्का

मावळमधून पार्थ पवारांना पराभवाचा धक्का, शिवसेनेच्या बारणेंनी राखला गड

मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकील्ला समजला जातो. मात्र, या बालेकील्याला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. या मतादरसंघात सेनेकडून पुन्हा श्रीरंग बारणे हे तर त्यांच्या विरोधात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, पुन्हा एकदा या मतदारसंघातील मतदारांनी बारणेंना दिल्ली पाठवले आहे. या मतदारसंघात पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

रायगडमधून केंद्रीय मंत्री अनंत गीतेंचा पराभव, सुनिल तटकरेंचा विजय

रायगड लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात होती. येथून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे मैदानात उतरले होते. मात्र, तटकरेंनी गीतेंचा पराभव करत दिल्ली गाठली आहे.

शिरुरमध्ये आढळराव पाटलांना क्लिन बोल्ड करत अमोल कोल्हेंनी गाठली दिल्ली, ६३ हजारांनी कोल्हेंचा विजय

शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात होती. येथून युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे चौथ्यांदा तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना मैदानात उतरले होते. या मतदारसंघात आढळराव पाटलांनी थेट पवारांना आव्हान दिले होते. तर राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना तिकीट देऊन आढळराव पाटलांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. अखेर अमोल कोल्होंनी आढळराव पाटलांनी क्लिन बोल्ड करत दिल्ली गाठली आहे. कोल्हेंनी ६३ हजार मतांनी आढळराव पाटलांचा पराभ केला आहे.

बारामती राष्ट्रवादीचाच अभेद्य गड, तब्बल १ लाख ५४ हजार मतांनी सुप्रिया सुळे विजयी

बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानला जातो. मात्र, यावेळी या अभेद्य गडाला तडे पाडण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या तर त्यांच्या विरोधात भाजपने दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. ही लढतही अत्यंत चर्चेची ठरली होती. मात्र अखेर राष्ट्रवादीने हा गड काय राखला आहे. तब्बल १ लाख ५४ हजार मतांनी सुप्रिया सुळेंनी कांचन कुल यांचा पराभ केला.

विनायक राऊतांनी राखला गड, निलेश राणेंच्या पदरी पराभव

या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवली होती. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचे आव्हान होते.काँग्रेसकडून नविनचंद्र बांदिवडेकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.या चुरशीच्या लढतीत अखेर विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी बाजी मारली आहे, त्यांनी निलेश राणेंचा पराभव केला आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विजयी, उर्मिल मातोंडकर यांचा पराभव

उत्तर मुंबई हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर काँग्रेसच्या उमेदवार रंगीला गर्ल उर्मिला मांतोडकर यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. मात्र, यामध्ये गोपाळ शेट्टींनी पुन्हा बाजी मारली आहे. २०१४ च्या निवडणुकीत ४ लाख ४६ हजार ५८२ मतांची आघाडी घेऊन गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा पराभव केला होता. महाराष्ट्रातील सर्वाधिक मते पदरी पडणाऱ्यांमध्ये मुंबईतील गोपाळ शेट्टी एकमेव ठरले होते.

नगर दक्षिणमधून सुजय विखेंचा विजय, संग्राम जगतापांना पराभवाचा धक्का

या मतदारसंघात शरद पवारांसह राधाकृष्ण विखेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे भाजपकडून तर आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. दोन्हीही उमेदवार हे अत्यंत तुल्यबळ मानले जात होते. मात्र, यामध्ये सुजय विखे पाटील यांचा विजय झाला आहे.


नागपूरमधून नितीन गडकरींचा विजय, नाना पटोलेंना पराभवाचा धक्का

नागपूर लोकसभेची लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात होती. या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने नाना पटोलेंना मैदानात उतरवले होते. मात्र, अखेर गडकरींनी बाजी मारत नागपूरचा गड कायम राखला आहे.

धुळ्यातून केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंचा विजय

धुळे लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सुभाष भामरे हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचा पराभ केला होता. या मतदारसंघातून भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटेंनी निवडणूक लढली होती.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ, भाजपचे हंसराज अहिर पुछाडीवर

या मतदारसंघात केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ते मागील १५ वर्षापासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने बाळू धानोरकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. आता येथून कोण बाजी मारणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. येथून भाजपचे हंसराज अहिर हे पिछाडीवर आहेत. तर काँग्रसेचे बाळू धानोरकर हे आघाडीवर आहेत.

औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरेंना फटका, इम्तियाज जलील विजयी

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी त्यांचा पराभव केला. शिवसेनेला हा जोरदार धक्का आहे. कारण गेल्या २० वर्षापासून चंद्रकांत खैरे हे येथून खासदार होते. जलील यांनी येथून विजय मिळवल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे.

अशोक चव्हाणांना पराभवाचा धक्का, प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी

नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना पराभवाचा धक्का बसला आहे. येथून प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झाले आहेत. अशोक चव्हाणांचा पराभव हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे विजयी, समीर भुजबळांचा पराभव

या मतदारसंघात शिवसेनेसह राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी निवडणूक लढवली होती.यामध्ये पुन्हा शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी विजय मिळवला आहे.

कोल्हापुरात संजय मंडलिकांनी फडकवला भगवा, राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांचा पराभव

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव करत संजय मंडलिक यांनी भगवा फडकवला आहे. ही लढत अत्यंत तुल्यबळ मानली जात होती. दुसऱ्यांदा हे दोन्ही उमेदवार आमने-सामने आल्याने निवडणूकीत रंगत निर्माण झाली होती. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आमचं ठरलय म्हणत मंडलीक यांना मदत केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक तुल्यबळ मानली जात होती.

राजू शेट्टींची हॅट्रीक हुकली, धैर्यशील मानेंनी घेतली विकेट

हातकाणंंगाले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनी त्यांच्या पराभव केला. राजू शेट्टींनी दोन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते.यावेळी ते हॅट्रीक करणार असे बोलले जात होते. मात्र, शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनी त्यांची विकेट घेत दिल्ली गाठली.

सुशिलकुमार शिंदेचा पुन्हा पराभव, सोलापूरमधूनडॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा विजय

या मतादारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे तर त्यांच्या विरोधात भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे तर वंचित बहुजन आघाडीकडून अॅड. प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. मात्र, या लढतीत भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी बाजी मारली.

पुनम महाजन पुन्हा विजयी, प्रिया दत्त यांना पराभवाचा धक्का

या मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपच्या पुनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात लोकसभेचा सामना रंगला होता. यावेळची लढत ही अत्यंत अतितटीची मानली जात होती.यामध्ये पुनम महाजन यांनी विजय मिळवत प्रिया दत्त यांना धक्का दिला आहे.

काँग्रेसच्या मिलिंद देवरांचा पुन्हा पराभव, तब्बल ९९ हजार मतांनी अरविंद सावंत विजयी

येथून पुन्हा एकदा शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सांवत हे विजयी झाले आहेत. त्यांनी ९९ हजार मतांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरांचा पराभव केला. यावेळी ही लढत अत्यंत तुल्यबळ मानली जात होती. मात्र, अखेर अरविंद सावंतांनी देवरांचा पराभ करत दिल्ली गाठली.

Last Updated : May 23, 2019, 11:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details