मुंबई - शिवसेना-भाजप युतीचे घोंगडे भिजत असले तरी भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराच्या कार्यक्रमांची आखणी केली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी पक्षाने 'समर्पण दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुनगंटीवारांनी कार्यकर्त्यांना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.
मुनगंटीवार म्हणाले, की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म, मानवतावाद आणि अंत्योदयाचा विचार मांडला. त्यांचे विचार देशभरातील भाजप कार्यकर्त्यांसाठी ऊर्जास्त्रोत आहेत. सत्ता हे परिवर्तनाचे साधन आहे, असे मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्योदयाच्या संकल्पनेप्रमाणे रांगेतील शेवटच्या माणसाच्या आनंदासाठी काम करत आहेत. सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन विकास करण्यास भाजप वचनबद्ध आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाची धोरणे राबवली पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
समर्पण दिवस या माध्यमातून मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना २०१९ च्या निवडणुकांचीही आठवण करून दिली. राज्यात मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी विविध मोहिमा राबवण्यासाठी प्रचार यंत्रणा सज्ज झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
किमान ५० रुपये पक्ष निधी देणे आवश्यक-
नमो अॅपच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी ते बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाच्या निधीत किमान ५० रुपये आर्थिक योगदान करणे आवश्यक असेल. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह स्वतः समर्पण करुन या मोहीमेचा शुभारंभ करतील. आर्थिक समर्पण करुन सर्वांनी याचे ट्वीट करायचे आहे.