मुंबई :'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक मुंबईला होणार आहे. 'इंडिया'च्या बैठकीसंदर्भात पूर्वतयारीविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बैठक सत्र मुंबईत सुरूय. मुंबईत होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मुंबईतील 'इंडिया' आघाडीची बैठक देशातील राजकारणाला कलाटणी देणारी असेल, अशा प्रकारचे वक्तव्य महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वारंवार केले जात आहे. भाजपाविरोधातील 26 पक्षांच्या आघाडीला 'इंडिया' आघाडी हे नाव कर्नाटकाच्या बैठकीत मिळालं. आता मुंबईतील बैठकीत 'इंडिया'आघाडी पक्षाला (लोगो) चिन्ह मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईमधील बैठकीत 'इंडिया' आघाडीचा लोगोचे अनावरण केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
लोगो होणार लॉन्च :विरोधकांनालोकसभा निवडणुकीत केंद्रातील भाजपा सरकारला पराभूत करायचं आहे. यामुळे देशातील भाजपाविरोधातील आणि लोकशाही मानणारे सर्वपक्ष एकत्र आलेत. यापूर्वी 'इंडिया' आघाडीच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. आता मुंबईत तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी एका पंचतारंकित हॉटेलमध्ये पार पडणार आहे. या बैठकीला 26 पेक्षा जास्त पक्ष येणार आहेत. मुंबईतील बैठकीमध्ये 'इंडिया' आघाडीच्या नवीन लोगोचे अनावरण होणार आहे. 'इंडिया' नावाला शोभेल अशा पद्धतीचे चिन्ह तिरंग्याच्या रंगात तयार केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यासोबतच 26 पक्षांमधून महत्त्वाच्या 11 नेत्यांची समिती तयार करण्यात येईल. मुंबईतील बैठकीत अजेंडा ठरवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर दुसऱ्या दिवशी 30 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण एकत्रित पत्रकार परिषद घेतील, असं सांगितलं जातंय.