मुंबई- महाराराष्ट्रातील लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा झाल्यानंतर फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधत, राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत कायम राहाणार असल्याचे सांगितले.
- 30 एप्रिलनंतरही लॉकडाऊनचे संकेत -
14 एप्रिलनंतर नेमकं काय करणार हे लवकरच स्पष्ट करण्यात येणार आहे. उलट-सुलट चर्चा होऊ नये, म्हणून मी स्वतःहून जनतेला संबोधित करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरु राहाणार असल्याचे सांगतानाच यापुढेही गरज पडली तर लॉकडाऊन सुरु राहू शकतो, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. काही ठिकाणची बंधन शिथील करण्यात येतील तर काही ठिकाणांवरील बंधने आणखी कडक करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- काही भागातील नियम शिथील -
मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्रातल्या संख्येच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ज्या भागात आवश्यकता आहे तिथे लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यात येतील. तर काही ठिकाणी जिथे कोरोनाचा धोका कमी आहे तिथे हे नियम काही प्रमाणात शिथिल होतील.
14 एप्रिलनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार. शेतीच्या कामाला लॉकडाऊनमध्ये परवानगी आहे. ती तशीच चालू राहिल. तसंच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
- तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो -
लॉकडाऊन कधीपर्यंत पुढे सुरू राहील, हे तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातात आहे. विषाणूची साखळी आहे, ती तोडायची आहे. ती तोडली की, आपण सगळे या साखळदंडातून बाहेर पडू. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो असा धीरही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना दिला.
- लॉकडाऊनमध्ये हे सुरुच राहणार -
या लॉकडाऊनच्या काळात शेती, शेतीसंबंधीची कामे, शेतमाल वाहतूक, जीवनावश्यक वस्तुंची उपलब्धता, औषधे यांची वाहतूक आणि पुरवठा सुरुच
- काय करायचे यावर काम सुरु -
14 एप्रिल नंतर काय करायचे यावर काम सुरु आहे, त्याची माहिती मी आपणा सर्वांना 14 तारखेपर्यंत देईनच, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. धैर्य, संयम आणि वागण्यातील शिस्तच आपल्या सभोवतालच्या शृखंला तोडणार असल्याचे ते म्हणाले. शक्यतो घराबाहेर पडू नका, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी जावे लागले तरी गर्दी करू नका, मास्क लावूनच बाहेर जा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
घरातील जेष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन करतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यात आतापर्यंत 33 हजार चाचण्या करण्यात आल्याचे सांगितले. एकट्या मुंबईत 19 हजार चाचण्या झाल्याची माहिती देतांना त्यांनी 1 हजार पॉझेटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती दिली.
- महाराष्ट्र धीरोदत्त, देशाला दिशा दाखवणारा -
आतापर्यंत महाराष्ट्राने धीरोदत्तपणे या संकटाशी सामना केला आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवतो या संकटातही माहाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नागरिकांना गडबडून, गोंधळून न जाण्याची विनंती केली. ही बंदी किती दिवस हे आपल्याच हातात असल्याचे सांगतांना शिस्त व्यवस्थित पाळली तर विषाणूची साखळी तुटेल याची जाणीव ही त्यांनी करून दिली. संपूर्ण देश एकासंघपणे या विषाणूशी लढतोय, यात कोणतेही राजकारण करायचे नाही हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ही एकजुट सदासर्वदा अशीच कायम ठेवली तर महाराष्ट्र देश कोरोनाच्या संकटावर नक्कीच मात करील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.