मुंबई - राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक अशा बीडीडी चाळ पुनर्विकासालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. 22 मार्चपासून पात्रता निश्चिती, संक्रमण शिबिरात रहिवाशांचे स्थलांतर आणि इतर कामे बंद आहेत. तर परिस्थिती जोवर व्यवस्थित होत नाही तोवर काम सुरू करता येणार नाही. त्यामुळे प्रकल्पाला किमान सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची वेळ येणार असल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आहे.
वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव अशा तीन ठिकाणच्या जुन्या-मोडकळीस आलेल्या बीडीडी चाळीचा रखडलेला पुनर्विकास आता म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. त्यानुसार एन. एम. जोशी मार्ग येथील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीचे काम मार्च दरम्यान सुरू होते. 607 रहिवाशांची पात्रता निश्चिती झाली होती. तर त्यातील 263 जणांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात आले आहे. मार्च ते मे दरम्यान पात्रता निश्चितीचा आकडा 607 वरून 800 वर न्यायचा होता. पण 22 मार्चला लॉकडाऊन झाले आणि हे काम बंद झाले अशी माहिती मुंबई मंडळातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.