मुंबईSplit in Mahayuti over post of CM :भारतीय जनता पक्ष (भाजपा)चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असतील असं वक्तव्य केलं होतं. तसंच त्यांचा शपथविधी मुंबईती वानखेडे स्टेडियमवर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याबाबत महायुतीत संभ्रम निर्माण झाला आहे.
महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच : देवेंद्र फडणवीस यांना नाईलाजानं सर्वाधिक आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळं आगामी निवडणुकीत भाजपाचं लक्ष मुख्यमंत्रीपदावर असणार आहे. त्यासाठी पक्षाच्या वतीनं कसून तयारी सुरू आहे. तर एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री पदासाठी महत्त्वाकांक्षी आहेत. आगामी विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्यास मुख्यमंत्रीपदाचा चेहरा शिंदेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडं अजित पवार यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. मात्र महायुतीमध्ये जागावाटपापूर्वीच मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना राजकीय रंग आला आहे.
फडणवीसचं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा :या संदर्भात बोलताना भाजपा प्रवक्ते विनोद वाघ म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून मुख्यमंत्रीपदी आपला नेता असावा, अशी पक्ष, कार्यकर्त्यांची इच्छा असते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. आगामी निवडणुकीत केंद्रीय नेतृत्व जे म्हणेल ते आम्ही मान्य करू. मात्र जास्तीत जास्त जागा जिंकून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील, याची तयारी करू, असं वाघ म्हणाले. त्यामुळं आगामी निवडणुकांसाठी भाजपाच्या वतीनं देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.