मुंबई -जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईमधील तब्बल दोन कोटी नागरिकांना मुंबई महापालिकेकडून सोयी सुविधा पुरवल्या जातात. अशा या महापालिकेची इमारत इंग्रजांच्या काळात बांधली असल्याने तिला ऐतिहासिक असे महत्व आहे. १५० वर्षांच्या आणि गॉथिक शैलीतील उभारण्यात आलेल्या या इमारतीचा जानेवारीपासून पर्यटकांना हॅरीटेज वॉक घेता येणार आहे. मात्र, याचा फायदा एका खासगी टूर ऑपरेटरला होणार असून महापालिकेवर स्वच्छता ठेवणे व सुरक्षा पुरवण्याचा भार पडणार आहे. यामुळे महापालिकेला नेमका याचा काय फायदा होणार? याबाबत प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत.
पर्यटनमंत्र्यांनी घेतला आढावा -
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाची हेरिटेज इमारत केवळ मुंबईकरांनाच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटक-सर्वसामान्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. त्यामुळे या वास्तूचे पर्यटन घडावे यासाठी पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार ऑक्टोबरमध्ये करण्यात आला आहे. त्यादृष्टीने ही इमारत पर्यटनासाठी खुली करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या तयारीचा आढावा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकार्यांसोबत घेतला. दरम्यान, पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अलीकडेच ८४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
गाईडसोबत ‘हेरिटेज वॉक’ -
मुंबई महानगर पालिकेची चार मजल्यांची मुख्यालयाची इमारत गॉथिक शैलीतील दगडी कामातून तयार करण्यात आलेली आहे. गॉथिक शैलीतील हे काम जागतिक वारसा असलेल्या वास्तूंमध्ये मोडते. या इमारतीबरोबरच पालिकेची सहा मजली विस्तारित इमारतही आहे. ही इमारत पर्यटनासाठी खुली झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर 'खाकी टूर' या कंपनीच्या गाईडच्या मदतीने पर्यटकांना पाहता येणार आहे. यावेळी पर्यटकांना गार्डडच्या माध्यमातून इमारतीचा इतिहास, आताचे महत्त्व सांगितले जाईल. ही सफर मोफत राहणार असल्याचे सामंजस्य करारात म्हटले स्पष्ट करण्यात आले आहे.