मुंबई- कुर्ला रेल्वे स्थानकात दूषित सरबत विकत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर महापालिका प्रशासनाने सरबत, ऊसाचा रस आणि बर्फगोळा विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ८१ टक्के नमुने दूषित आढळले आहेत. यामुळे सरबत, ऊसाचा रस आणि बर्फगोळा खाणाऱ्या मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसात तापमानात वाढ झाली आहे. मुंबईचे तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सियस दरम्यान असते. उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर रस्त्यावर मिळणारे सरबत, उसाचा रस आणि बर्फाचे गोळे खाऊन दिलासा मिळवत आहेत. मात्र, रस्त्यावर विकले जाणारे सरबत, उसाचा रस आणि बर्फाचे गोळे मुंबईकरांच्या आरोग्यास हानिकारक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत घेण्यात आलेल्या ५९६ नमुन्यांपैकी ५१९ नमुने पिण्यास अयोग्य होते. हे प्रमाण ८७ टक्के इतके होते. तर एप्रिल महिन्यात केलेल्या कारवाईत ९६८ नमुने घेण्यात आले त्यापैकी ७८६ नमुने दूषित असल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण ८१ टक्के इतके आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने एप्रिल महिन्यात केलेल्या कारवाईत लिंबू सरबतच्या २८० नमुन्यांची तपासणी केली असता त्यापैकी फक्त ६२ नमुने पिण्यायोग्य तर २१८ नमुने दूषित आढळले आहेत. उसाचा रसाच्या ३०३ नमुन्यांच्या तपासणीत फक्त ३५ नमुने पिण्यायोग्य आढळले तर २६८ दूषित आढळले आहेत. तसेच बर्फाच्या ३८५ नमुन्यांपैकी फक्त ८५ नमुने योग्य आढळले असून ३०० नमुने दूषित आढळले आहेत. यामुळे रस्त्यावर-उघड्यावर विकल्या जाणार्या सरबत आणि खाद्यपदार्थांमुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे घराबाहेर पडताना स्वच्छ पाणी स्वत:जवळ ठेवणे गरजेचे आहे. उघड्यावर खाद्यपदार्थ खाणे टाळावे असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.