मुंबई :विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सावित्रीबाई फुले यांच्या अवमानाबद्दल सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विकृत लेखन करणाऱ्या गुन्हेगाराबाबत विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, सरकारच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधी पक्षाने सरकारवर हल्लाबोल करत विधानसभेत गोंधळ घातला. बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या भूमिकेवर शंका व्यक्त करत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला.
सरकार गप्प कसे :यावेळी थोरात म्हणाले, 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अत्यंत चुकीचे, विकृत लेखन करणारा गुन्हेगार मोकाट आहे. या सगळ्यावर सरकार गप्प कसे? ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज आरोपीवर कठोर कारवाई केली नाही, तर उद्या महापुरुषांची बदनामी होऊ शकते. क्रांतिकारकांचा अपमान करणाऱ्या गुन्हेगाराला सरकारने शोधून अटक करावी, अशी मागणी देखील बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सरकारने क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या गुन्हेगाराला शोधून त्याच्या मुसक्या बांधून आणले पाहिजे, भर रस्त्यात त्याची धिंड काढली पाहिजे. पुन्हा असे लिखाण करण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असे थोरात म्हणाले. थोरात पुढे असेही म्हणाले की, ‘सत्य बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यासाठी सरकारने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, दुसरीकडे सावित्रीबाई फुलेंविरोधात लिखाण करणारे विकृत गुन्हेगार मोकाट फिरतात. हा कसला न्याय? असा सवाल देखील त्यांनी सरकारला विचारला आहे.