मुंबई -विले पार्ले हा मुंबईतील सर्वात उच्चशिक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. परंतु याच मतदारसंघात मुंबईतील सर्वात कमी शिकलेला उमेदवार उभा आहे. राजेंद्र नंदागवळी असे या उमेदवाराचे नाव आहे. राजेंद्र रिक्षा या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत. पहिली पर्यंतचेही शिक्षण झालेले नसताना केवळ कामगारांच्या प्रश्नांना न्याय आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी ते उच्चशिक्षित उमेदवारांच्या विरोधात उभे असल्याचे ते सांगतात.
राजेंद्र नंदागवळी हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील आहेत. मुंबईतील नाक्यावर ते काम करतात. विलेपार्ले मतदारसंघात काँग्रेस, भाजप, मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी मुख्य उमेदवारांच्या विरोधात ते मैदानात उतरले आहेत. आपल्या उमेदवारीसंदर्भात बोलताना राजेंद्र म्हणाले, "स्थानिकांना रोजगार मिळावा ही माझी प्रमुख मागणी आहे. कार्गो आदी ठिकाणी स्थानिकांना पळवून लावून इतर राज्यातील लोकांना रोजगार दिला जातो. याविरोधात मी उभा राहिलो आहे. ज्या कंपन्यांमध्ये स्थानिकांची संख्या जास्त होती अशा कंपन्या अनेक बंद करून त्या दुसऱ्या नावाने सुरू करण्यात आल्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा आणि कामगारांचे थकलेले पगार मिळावेत, ही भूमिका घेऊन मी मतदारसंघात फिरणार आहे"