मुंबई:राज्य शासन आणि मुंबई महापालिकेचे ४१७७ भूखंड मक्त्याने देण्यात आले आहेत. यातील बहुतेक भूखंड ९० वर्षांच्या कालावधीसाठी अल्प भाड्याने देण्यात आले आहेत. ४१७७ पैकी ३२३ भूखंडांचा भाडेकरार २०१३मध्ये संपला आहे. पूर्वी हे भूखंड ९० वर्षांसाठी भाडे करारावर नाममात्र भाड्याने दिले जात होते. पालिकेने त्यात २०१७ मध्ये बदल करून ९० वर्षांऐवजी ३० वर्षांच्या भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा भूखंडांचे भाडे रेडीरेकनरनुसार घेतले जाणार आहे.
केवळ ८९ भूखंडांचे नूतनीकरण:पालिकेने मक्त्याने दिलेल्या भूखंडांपैकी केवळ ८९ भूखंडांचे म्हणजेच २८ टक्के भूखंडांचे नूतनीकरण झाले आहे. उर्वरित २३४ भूखंडांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. अनेक भूखंडावर अतिक्रमणे आहेत. ते हटविल्याशिवाय भाडेकराराचे नूतनीकरण करण्यास प्रशासनाला अडचणी येत आहेत. त्यामुळे नूतनीकरणाची प्रक्रिया रखडली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नव्या धोरणानुसार नूतनीकरण:मुंबई महापालिकेने भाडेकरारावर दिलेल्या अनेक भूखंडांच्या भाडेकराराची मुदत संपली आहे. रेसकोर्स, वेलिंग्टन क्लब यासारख्या मोठ्या भूखंडांना यातून वगळून अन्य भूखंडांच्या भाडेकराराचे नूतनीकरण करण्याचे पालिकेने ठरवले आहे. अनुसूचित व्ही, एक्स, वाय, झेड आणि महापालिका अशाप्रकारे ४ हजार १७७ भूखंड ९९९ ते १० वर्ष कालावधीसाठी भाडेकरारावर देण्यात आलेले आहेत. यामधील ९९ वर्षांपर्यंत भाडे करार असलेल्या भूखंडांचे करार संपले आहे. नव्या धोरणानुसार या भूखंडांचे ३० वर्षांच्या कालावधीसाठी नूतनीकरण केले जाणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.