मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सहा महिने सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने शांततेत साजरे करण्यात आले. नुकतेच झालेले गणेशोत्सव देखील मुंबईत सर्वांनी सामाजिक उपक्रम राबवत साजरे केले. त्यात आता नवरात्र उत्सव देखील सुरू झाले आहे. मात्र, कोरोना संकटामुळे खबरदारी म्हणून नियम व अटी असल्याने मुंबईतील प्रसिद्ध देवींच्या दर्शनासाठी अनेकांना जाता आले नाही. त्यामुळे, ईटीव्ही भारतकडून मुंबईतील प्रसिद्ध नवरात्रौत्सवाबद्दल तुम्हाला जाणून घेता येणार आहे. प्रसिद्ध देवींची माहिती पुढील प्रमाणे आहे.
भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
मुंबईतील प्रसिद्ध नवरात्रौत्सव मंडळांपैकी एक म्हणजे 'भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ'. ४७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या या मंडळाची स्थापना १९७४ साली झाली. छोट्या स्वरुपात सुरुवात केलेल्या या उत्सवाला आता मोठे रूप प्राप्त झाले आहे. मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक विविध ठिकाणांहून भाविक नवरात्रौत्सवातील जल्लोष पहाण्यासाठी येतात. मंडळातील या सोहोळ्याला अरुण गवळी (डॅडी) यांचे सौजन्य लाभते. मूर्तिकार अशोक परब हे दरवर्षी चतुर्भुज देवीची मूर्ती बनवतात. 'दगडीचाळीची आई माऊली' या नावाने प्रसिद्ध असलेल्या देवीच्या ठिकाणी दरवर्षी कल्पनिक देखावा असतो. मंडळातील विद्युत रोषणाई आणि देवीची निघणारी भव्य मिरवणूक हे मंडळाचे खास वैशिष्ट्य. मंडळातील देवीची पूजा, अर्चा करण्यासाठी मंडळात पाच भटजींची सोय करण्यात येते. नवरात्रीतील ९ दिवसात विनामुल्य रास गरबा, विभागीय महिला भजन, अष्टमीला महाप्रसाद व देवीचा गोंधळ, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, लहान मुलांसाठी चित्रकला आणि वेशभूषा स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, असे अनेक कार्यक्रम केले जातात. पण यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मोठ्या उत्सवावर भर न देता सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
बंगाल क्लबची देवी (शिवाजी पार्क)
शिवाजी पार्कमध्ये गणेश मंदिराच्या बाजूला असलेल्या बंगाल क्लबतर्फे दुर्गापूजा केली जाते. बंगाल क्लबची स्थापना १९२२ ला शिवाजी पार्क येथे झाली. त्यानंतर तेरा वर्षानी १९३५ मध्ये क्लबतर्फे दुर्गापूजा सुरू झाली. मुंबईत स्थायिक झालेल्या बंगाली मंडळींना बंगालमध्ये दुर्गोत्सवासाठी जाता येत नसे. त्यामुळे, त्यांच्या नव्या पिढीला ही आपली संस्कृतीची माहिती होत नव्हती. ती होण्यासाठी क्लबच्या मंडळींनी या ठिकाणी दुर्गोत्सव साजरा करायला सुरुवात केली. तेव्हापासून अखंडपणे आजतागायत हा उत्सव सुरू आहे. यंदा हे दुर्गापूजेचे ८५ वे वर्ष आहे. या दुर्गादेवीचे वैशिष्ट्य म्हणजे षष्ठीलाया देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि दसऱ्याला तिचे विसर्जन केले जाते. मूळ बंगालमध्येही हा उत्सव षष्ठी ते दशमी असाच केला जातो. पंचमीचा दिवस हा बंगाली दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्याचा हा दुसरा दिवस असतो. बंगालमध्ये ही दुर्गा म्हणजे पार्वतीचे रूप आहे. पंचमीला पार्वती गणेश, कार्तिकेय, लक्ष्मी आणि सरस्वती अशा आपल्या दोन मुली आणि दोन मुलांसह माहेरपणासाठी येते, अशी कथा आहे. म्हणूनच या दुर्गेसोबत तुम्हाला लक्ष्मी, सरस्वती, गणपती आणि मयुरावर विराजमान झालेला कार्तिकेयही दादर येथे याठिकाणी पाहायला मिळते.’ या देवीच्या दर्शनासाठी देखील मोठी गर्दी होते. त्यामुळे, यंदा साध्या पद्धतीने काही पदाधिकारी यांच्या उपस्थित येथे सोहोळा पार पडणार आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवासाठी होणार खर्च हा लोकांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. तसेच, या देवीचे दर्शन भाविकांसाठी फेसबुकवर ऑनलाइन प्रसारित करण्यात आले आहे.
नवी चिखलवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, ग्रॅण्टरोड
ग्रॅण्टरोड (प) स्लेटर रोड स्थित प्रसिद्ध नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना १९७३ साली झाली असून मंडळाने ४८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. चिंचपोकळीचे मूर्तिकार गणेश पोहेकर यांनी तयार केलेली ४ फुट उंच अष्टभूज आणि हातात विविध शस्त्रे असलेली सिंहावर विराजमान देवीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी असते. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या देवीच्या मूर्तीचे बुकिंग २०२७ पर्यंत झाले असून सजावटीपासून ते देवीच्या प्रत्येक कामात तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असतो. मंडळात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो. दर दिवशी देवीला ४ साड्या नेसवण्याचे काम सांताक्रूझ येथील भावना दलाल या करतात. मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मंडळातील देखावा हा खुला असून देवीचे दर्शन लांबूनही घेता येते. दसऱ्याच्या दिवशी मंडळातील महिला पाककलेच्या साह्याने विविध पदार्थ तयार करून देवीला '५६ भोग' नैवेद्य म्हणून दिला जातो. मंडळात विनामुल्य गरबा-दांडिया, वेशभूषा स्पर्धा, लहान मुलांसाठी चित्रकला असे अनेक कार्यक्रम केले जातात. मात्र, यंदा मंडळाने सांस्कृतीक कार्यक्रम न घेता वैद्यकीय तपासणी शिबीर, गरजू रुग्णांना मदत व अशी अनेक सामजिक कामे केली आहेत.
परळ विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, कामगार मैदान
परळ भागातील प्रसिद्ध नवरात्र उत्सव मंडळ. ६२ व्या वर्षात पदार्पण केलेल्या मंडळाचे शिवसेना परळ शाखा हे व्यवस्थापक आहेत. ब्रिटिश काळापासून स्थापन झालेल्या या मंडळाचा उत्सव सुरुवातीला दामोदर हॉलमध्ये साजरा केला जात होता. मंडळात प्रथम कागदावरील देवीच्या मूर्तीची पूजा केली जात होती. कालांतराने म्हणजे १९५१ सालापासून हा उत्सव कामगार मैदानात साजरा केला जातो. सुप्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांनी साकारलेली ९ फुट उंच अष्टभूज देवीची मूर्ती सुवर्णालांकारानी मढवलेली असते. मात्र, यंदा चार फुटाची मूर्ती बसवण्यात आली आहे. यंदा देवीची मूर्ती ही राक्षासाचा वध करणारी असून, ती मूर्ती शास्त्रोक्त आहे. मंदिरातील देखावा हा बंदिस्त नसून देवीचे खुले दर्शन दिले जाते. याठिकाणी नवरात्रौत्सवादरम्यान चंडीपाठ, हवन, सहस्त्र कुंकू मार्चन, तर यंदा चंडी अभिषेक देखील केला गेला आहे.
तसेच, अष्टमी आणि नवमीला होमहवन आणि या होमाची पूर्णाहुती नवमीला केली जाते. मंडळातर्फे अनेक सांस्कृतिक कामे केली जातात. दहावी-बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहोळा, लहान मुलांसाठी चित्रकला, स्मरणशक्ती, नृत्य स्पर्धा, असे अनेक कार्यक्रम केले जातात. तसेच, सामाजिक कार्यात के.ई.एम रुग्णालयात मदत, रक्तदान शिबीर, दुर्घटनाग्रस्तांना मदत अशी अनेक सामाजिक कामे या मंडळाने केली आहेत. यावर्षीची नवरात्र ही कोरोना योद्ध्यांना मानवंदना देणारी असून लोकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करत अगदी साध्यापद्धतीने उत्सव साजरा करण्यात येत आहे.
सायनची आई भवानी (सरदारनगर सार्वजनिक दसरा महोत्सव मंडळ):
१९५९ साली स्थापन झालेल्या मंडळाने यंदा ६३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. 'सायनची आईभवानी' या नावाने प्रसिद्ध असलेली देवी ही ५ फुट उंच असून ती वाघावर विराजमान झालेली असते. गेल्या २५ वर्षांपासून देवीची मूर्ती पेणकर आर्ट्स तर्फे घडवली जाते. दरवर्षी देवी सुंदर अशा महालात विराजमान होते. नवरात्रौत्सवात महिलांसाठी भोंडला हा पारंपारिक कार्यक्रम असून लहान मुलांसाठी चित्रकला, स्मरणशक्ती, वेशभूषा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. मंडळात पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम केला जातो. मंडळातील देवीच्या आरतीला संपूर्ण परिसरातील लोकांचा सहभाग असून आरतीचा सोहोळा फार मोठा असतो. तसेच, देवीच्या समोर गरबा, दांडिया स्पर्धा असतात. अष्टमीला होमहवन असून महाभंडारा घातला जातो. मात्र, यंदा या ठिकाणी असे काही न करता अगदी साधेपणाने या ठिकाणी उत्सव साजरा केला जात आहे.