महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मागील ५ वर्षात मॅनहोल, गटारात पडून तसेच समुद्रात बुडून ३२८ जणांचा मृत्यू - आपत्कालीन व्यवस्थापन विभाग

मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार २०१३ ते २०१८ या ५ वर्षाच्या कालावधीत मॅनहोल, उघडी गटारे आणि समुद्रात बुडण्याच्या ६३९ घटना नोंद झाल्या आहेत. यात ३२८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ९१ स्त्रियांचा तर २३७ पुरुषांचा समावेश आहे. तर १६७ जण जखमी झाले आहेत. त्यात ४५ स्त्रिया आणि १२२ पुरुषांचा समावेश आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख

By

Published : Jul 11, 2019, 8:47 PM IST

मुंबई - जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. या जागतिक दर्जाच्या शहरात गटारात, मॅनहोलमध्ये पडून तसेच समुद्रात बुडून मागील ५ वर्षात ३२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १६७ जण जखमी झाले आहेत, अशी आकडेवारी माहिती अधिकारात समोर आली आहे. गटारांमध्ये तसेच मॅनहोलमध्ये बुडून झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख

मुंबईत रोजच अपघात होत असतात. रेल्वे आणि रस्ते अपघातातही अनेकांचा मृत्यू होतो. मात्र, त्याचबरोबर मुंबईमधील गटारे, मॅनहोल तसेच समुद्रात बुडून अनेकांचा मृत्यू होत असतो. याबाबतची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून मागवली होती.

दरम्यान, पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार २०१३ ते २०१८ या ५ वर्षाच्या कालावधीत मॅनहोल, उघडी गटारे आणि समुद्रात बुडण्याच्या ६३९ घटना नोंद झाल्या आहेत. यात ३२८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ९१ स्त्रियांचा तर २३७ पुरुषांचा समावेश आहे. तर १६७ जण जखमी झाले आहेत. त्यात ४५ स्त्रिया आणि १२२ पुरुषांचा समावेश आहे.

गटारांमध्ये, मॅनहोलमध्ये पडण्याच्या तसेच समुद्रात बुडण्याच्या २०१३ मध्ये ८० घटना नोंद झाल्या आहेत. त्यात २४ जण जखमी झाले आहेत तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१४ मध्ये १०३ घटना नोंद झाल्या असून २७ जण जखमी झाले आहेत तर ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१५ मध्ये ८५ घटनांची नोंद झाली असून २४ जण जखमी झाले असून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

२०१६ मध्ये १२९ घटना नोंद झाल्या असून ४६ जण जखमी झाले आहेत. तर ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१७ मध्ये १५४ घटनांची नोंद झाली असून २५ जण जखमी झाले आहेत. तर ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१८ मध्ये जुलैपर्यंत ८८ घटनांची नोंद झाली असून २१ जण जखमी झाले आहेत. तर ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. मॅनहोल व उघड्या गटारात पडून होणाऱ्या घटना रोखण्यासाठी पालिकेने ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details