मुंबई- कोकणात चर्चेत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प स्थलांतर करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या घोषणेवेळी दिली. मात्र, त्यावर आज नाणार प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोकणच्या पाठीवर मारा परंतु, बेरोजगार तरुणांच्या पोटावर मारू नका, अशी विंनती नाणार समर्थकांनी केली आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले असल्याचे भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले.
कोकणच्या पाठीवर मारा, बेरोजगारी तरुणांच्या पोटावर मारू नका - mumbai
नाणार प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
आज दुपारी नाणार प्रकल्प रद्द करा या मागणीसाठी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर या अधिवेशनात अधिसूचना काढणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्या भेटीनंतर नाणार प्रकल्प समर्थकांच्या १५ लोकांच्या समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नाणार प्रकल्प व्हावा, अशी आमची मागणी आहे. जमीन मालक प्रकल्पासाठी जमीन देण्यास तयार आहेत. सरकारने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी समर्थकांनी केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आम्हाला एक सांगायचे आहे. कोकणात अनेक शिवसैनिक देखील बेकार आहेत, या प्रकल्पामुळे बेरोजगार तरुणांचा प्रश्न सुटेल. अजून वेळ गेलेली नाही, त्यामुळे नाणार प्रकल्प कोकणात व्हावा, या प्रकल्पामुळे कोकणातील बेरोजगारी कमी होईल, असे जिल्हाध्यक्ष जठार म्हणाले.