विषाणूग्रस्त टोमॅटो उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची किसान सभेची मागणी - डॉ. अजित नवले
विषाणूग्रस्त टोमॅटो प्रश्नी शेतकऱ्यांना अचूक व समाधानकारक निदान उपलब्ध करावे आणि पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.
मुंबई - ई-टीव्ही भारतच्या दणक्यानंतर तपासणीला गेलेल्या विषाणू त्रस्त टोमॅटोचा प्रश्न आता किसान सभेच्या अजेंड्यावर आला आहे. विषाणूग्रस्त टोमॅटो प्रश्नी शेतकऱ्यांना अचूक व समाधानकारक निदान उपलब्ध करावे आणि पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन पाठविण्यात आले आहे. रोग निदानाबाबत प्राप्त झालेल्या केंद्रीय संस्थेच्या अहवालाबाबतही निवेदनात शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व नाशवंत पिकांना विमा योजना सुरू करावी, अशी मागणीही केली आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन संस्था (आयआयएचआर) बंगरुळु या संस्थेला पाठविलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. यानुसार टोमॅटोवर चार मुख्य विषाणूंचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फळ परिपक्व होण्याच्या काळात तापमान वाढल्यामुळे, खतांचा व पोषकांचा अति वापर झाल्याने टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याचे सूचित करण्यात आले आहे, मात्र याबाबत शेतकरी सहमत नाहीत. वरील विषाणूंचा संसर्ग टोमॅटो पिकात या पूर्वीही आढळलेला आहे. मात्र एकाच वेळी हा संसर्ग साथीच्या रोगा सारखा चार जिल्ह्यात पसरल्याची बाब वेगळी आहे. संसर्गाचे साथ सदृश परिस्थितीत रुपांतर कशामुळे झाले, हे या पार्श्वभूमीवर शोधणे आवश्यक आहे. प्राप्त अहवालावरून या संसर्ग विस्ताराचे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे किसान सभेने निवेदनात म्हटले आहे.
संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नवीन पीक घेताना कोणते बियाणे वापरावे, काय प्रतिबंधात्मक उपाय करावे याचे मार्गदर्शनही शेतकऱ्यांना होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या वरील शंकाही दूर होणे आवश्यक आहे. सरकारने या दृष्टीने पावले उचलावीत, अशी मागणी किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे.पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ.अजित नवले यांनी निवेदनात केली आहे.
टॉमेटो पिकावर झालेल्या संसर्गाचे साथीत रुपांतर झाले असून शेतकऱ्यांच्या अनेक गंभीर शंका आहेत.
1. एकाच वेळी टोमॅटोची झाडे विविध पाच किंवा सहा विषाणूच्या संसर्गाने बाधित झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांचा अनुभव पहाता वर सांगितलेल्या जवळपास सर्वच विषाणूंचा प्रादुर्भाव पूर्वीही टॉमेटो पिकांवर वेळोवेळी झालेला आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात यामुळे नुकसान होऊन संसर्गाची साथ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा प्रकार यापूर्वी नजीकच्या काळात घडलेला नाही. चार जिल्ह्यातील टॉमेटो उत्पादक क्षेत्र अशाप्रकारे संक्रमित होणे ही विशेष व गंभीर बाब आहे. संसर्ग अशाप्रकारे साथीच्या स्वरूपात इतक्या मोठ्या प्रमाणात कसा पसरला याचे समाधानकारक उत्तर रिपोर्टवरून मिळत नाही.
2. वाढलेल्या तापमानामुळे विषाणू संसर्गाचे साथीत रुपांतर झाले असे सूचित करण्यात येत आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी टॉमेटो उत्पादक पट्यातील तापमान कमी राहिलेले आहे. शिवाय एकाच तालुक्यात विविध भौगोलिक पट्टयात तापमानात मोठी भिन्नता आहे. अशा परिस्थतीत तापमान भिन्न असलेले चार जिल्ह्यातील क्षेत्र एकाचवेळी तापमानामुळे संसर्गाचे शिकार होणे संभवत नाही.
3. विषाणू संसर्गाची वाहक असलेल्या पांढरी माशी, मावा कीड यासारख्या संसर्ग माध्यमांचा मोठा फैलाव कोठेही आढळला नाही. असे असताना विषाणूचा संसर्ग जिल्ह्याच्या सीमा पार करून चार जिल्ह्यात पोहोचला आहे. अशा परिस्थितीत नक्की या संसर्गाच्या वाहकाचे कार्य असे झाले व कोणत्या घटकामुळे झाले याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. आगामी काळात संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी ते आवश्यक आहे.
4. खतांचा व पोषकांचा वापर करताना टोमॅटो उत्पादक शेतकरी कधीही अतिरेक करत नाहीत. ठरलेल्या शेड्यूल प्रमाणेच रासायनिक खते व पोषके वापरतात. त्यामुळे कुठेही खतांचा किंवा पोषकांचा अतिरेक होत नाही. शिवाय असा अतिरेक झालाच तर टोमॅटोमध्ये सेटिंग अजिबात व्यवस्थित होत नाही हे शेतकऱ्याला देखील माहीत आहे. बहुतांश शेतकरी म्हणूनच माती परीक्षण करूनच खतांची मात्रा देतात. सदरचा दिसत असणारा रोग 1 किंवा 2 एकरवर नसून जवळपास 15,000 एकरापर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो पट्ट्यांमध्ये पसरलेला आहे. एकाच वेळेला या पट्ट्यातील सर्व शेतक-यांनी खतांचा किंवा पोषकांचा अतिरेकी वापर केला असल्याचा युक्तिवाद पटत नाही. शेतकऱ्यांनी मागील वर्षी ज्या पद्धतीने खते व पोषके यांचा वापर केला तसाच या वर्षीही केला. मागील वर्षी संसर्ग पसरला नाही मात्र या वर्षी तशीच खते, पोषाके वापरून संसर्ग पसरला आहे. सबब खते व पोषके यांचा चुकीचा वापर झाल्याने ही आपत्ती आली हा युक्तिवाद पटत नाही.
5. टॉमेटो पिकाच्या या नुकसानीला बियाणांमधील दोष कारणीभूत आहे काय या अंगाने चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कृषी विभागामार्फत बियाणांची सॅम्पल्स आयआयएचआर बेंगलोर येथे पाठविण्यात आले आहेत. लवकरात लवकर या बाबतचा रिपोर्ट प्राप्त होणे आवश्यक आहे.
शिवाय ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आपण आपल्या सरकारच्या वतीने या दृष्टीने पावले उचलावीत, अशी विनंती किसान सभेने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.