मुंबई- कोणताही विचार न करता राज्य सरकारने विकास प्रकल्प बंद करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे राज्याची प्रगती खुंटणार आहे. मेट्रो कारशेडशिवाय मेट्रो सुरू होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने मेट्रो कारशेड उभारणीसाठी घातलेली बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
हेही वाचा - जागेसाठी झालेल्या वादात प्रवाशाला चालत्या लोकलमधून फेकले बाहेर; हार्बर मार्गावरील प्रकार
यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधी झाल्यानंतर घाई-घाईत मेट्रोच्या कारशेडला स्थगिती दिली आहे. पर्यायी कारशेड कुठे उभे राहणार याबाबत स्पष्टता नाही. या प्रकल्पासाठी कारशेड नसेल तर मेट्रो चालू शकणार नाही. 23 हजार कोटीची गुंतवणूक वाया जाणार आहे. जपानी वित्तीय कंपनीने यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये केंद्र सरकारची गुंतवणूक झाली आहे. या प्रकल्पासाठी एक कंपनी तयार केली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये यासंदर्भात काही निर्णय झाले आहेत. मेट्रो कारशेडसाठी उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याची पायमल्ली होत आहे, हे चालणार नाही, असे सोमय्या म्हणाले.