मुंबई - 5 हजार खाटांच्या कोविड हॉस्पिटलच्या नावाने ठाकरे सरकारने 12 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. बिल्डरची 3 हजार कोटींची 22 एकर जमीन विकत घेण्याचा कोणताही प्रस्ताव नसताना ती जमीन विकत घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली.
माध्यमांशी बोलताना किरीट सोमैया जमिनीचे अधिग्रहण अनधिकृत -
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार होत आहे. गेले आठ महिने आरोग्य विभाग कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत 5 हजार खाटांचे साथ नियंत्रण रुग्णालय उभारले जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने 22 एकर जागा अधिग्रहित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. हे आदेश देताना कोणत्याही पातळीवर चर्चा झाली नव्हती. रुग्णालय उभारण्याबाबत आवश्यक असा अहवालही तयार करण्यात आला नव्हता. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर पालिका आयुक्तांनी जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. वृत्तपत्रात जाहिरात देऊन निविदा मागवून तातडीने श्वास कन्स्ट्रक्शनची जागा पालिकेने ताब्यात घेतली. या जागेची मालकी किंवा लीजचे हक्क श्वास कन्स्ट्रक्शनकडे आहेत की नाही याबाबत कायदेशीर बाबींची पडताळणीही करण्यात आली नाही.
लोकायुक्तांमार्फत व्हावी चौकशी -
राज्य सरकारकडे आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा नसल्याने कोविड उपचारासाठी उभारण्यात आलेली जम्बो कोविड सेंटर खासगी डॉक्टरांना हस्तांतरित करण्यात आली आहेत. असे असताना 5 हजार खाटांचे रुग्णालय चालवणे राज्य सरकार आणि महानगरपालिकेला शक्य होणार आहे का? रुग्णालय उभारणीचा संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे. यात 12 हजार कोटींचा घोटाळा आहे. या रुग्णालय उभारणीचा खर्च मुंबईकरांनी भरलेल्या कराच्या रक्कमेतून होणार असल्याने मुंबईकरांनी हा भुर्दंड का सोसावा? असे प्रश्न सोमैया यांनी उपस्थित केले आहेत. या व्यवहाराची लोकायुक्तांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचे सोमैया यांनी सांगितले.