मुंबई -मुंबईतील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने केरळवरून डॉक्टर आणि नर्सची टीम मागवली. ही टीम दीड महिन्यापासून काम करत आहे. पण या टीमला मुंबई महानगर पालिकेने अजून पगारच दिला नाही. पाठपुरावा करूनही पगार मिळत नसल्याने आता निराश होऊन 40 डॉक्टरांनी केरळला परत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केरळ टीमचे प्रमुख डॉ. संतोष कुमार यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
मुंबईमध्ये काम करूनही पगार मिळत नसल्याने केरळचे 40 डॉक्टर निघाले मायदेशी
जून महिन्यामध्ये 40 डॉक्टर आणि 25 नर्स केरळमधून मुंबईत आरोग्य सेवा करण्यासाठी आले. त्यांनी पालिकेच्या सेव्हन हिल्स कोव्हिड रुग्णालयात सेवा केली. मात्र, पगार न दिल्यामुळे 40 डॉक्टरांनी मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
जूनमध्ये 40 डॉक्टर आणि 25 नर्स केरळमधून मुंबईत आल्या. डॉक्टर-नर्सची ही टीम जूनपासून पालिकेच्या सेव्हन हिल्स कोव्हिड रुग्णालयात सेवा देत आहेत. दरम्यान, नर्सला 30 हजार, एमबीबीएस डॉक्टरांना 80 हजार तर स्पेशलिस्ट डॉक्टरांना 2 लाख असा पगार लागू करण्यात आला आहे. तर इतर भत्ते ही लागू आहेत.
5 जुलैला या टीमला पगार मिळणे अपेक्षित होते. पण त्यांना मोबदला दिलेला नाही. त्यामुळे पालिकेकडे पाठपुरावा केला. पगार येईल असे सांगण्यात आले. पण पगार काही आला नाही. त्यामुळे पुन्हा पाठपुरावा केला असून, आजपर्यंत पगार आलेला नाही. इतर भत्ते ही मिळाले ले नाही असेही डॉ. संतोष कुमार यांनी सांगितले आहे. पगार आणि भत्ते मिळत नसतील तर आम्ही इथे कसे राहणार? असा प्रश्न डॉक्टरांनी उपस्थित केला. शेवटी त्यांनी आता केरळला परत जाण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार 40 डॉक्टर परत जाणार आहेत. यातील काही डॉक्टर आज तर काही उद्या जातील असेही डॉ. संतोष कुमार यांनी सांगितले आहे. डॉक्टर केरळला परत जाणार असले तरी 25 नर्स मात्र सेवा देणार आहेत. त्यांनी अद्याप परत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. दरम्यान याविषयी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही.