मुंबई- मुंबई महानगरपालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून परेल येथील केईएम रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी असते. रुग्णांना चांगली सुविधा देता यावी म्हणून दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर रुग्णालायाचे आधुनिकरण करून संपूर्ण रुग्णालय वातानुकूलीत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी व आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या भेटीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.
पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्यासह केईएम रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान केईएम रुग्णालयाचा आढावा घेण्यात आला. यावेळी रुग्णालयात रुग्णांना योग्य पद्धतीने उपचार मिळावेत, यासाठी केईएम रुग्णालयाचे अत्याधुनिकीकरण करण्याचा विचार करण्यात आला. दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर रुग्णालयातील सर्व वॉर्ड वातानुकूलित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. प्रत्येक वॉर्डमध्ये स्वछतेसाठी २४ तास कामगार, निवासी वैद्यकीय अधिकारी, वसतिगृहाची दुरूस्ती, निवासी डॉक्टर यांच्यासाठी प्रस्तावित मल्टिपर्पज कोर्ट आदी निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.