पंढरपूर: तेलगणांचे मुख्यमंत्री के. सी. आर यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांनी अनेक कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश घेतला आहे. सत्ता आल्यास भगीरथचे पाणी हे मंगळवेढ्यात आणण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्येबाबत केसीआर यांनी आपली भूमिका मांडायला सुरुवात केली आहे.
डिजीटल इंडिया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी का नाही, मेक इन इंडिया आहे तर चायना बाजार का असतो? वीज कंपन्यांचे खासगीकरण का? बीआरएस ही कुणाची बी टीम नसून शेतकऱ्यांची टीम आहे. खासगीकरूनही शेतकऱ्यांना वीज का मिळत नाही? तेलंगणासारख्या योजना महाराष्ट्रात का नाही, याचा जाब शेतकऱ्यांनी सरकारला विचारावा, असे आवाहन केसीआर यांनी जनतेला केले आहे. शेतकऱ्यांसाठी वेगळ्या योजना तेलंगणा सरकारने दिल्या आहेत. मात्र, इतर राजकीय पक्ष उलटसुलट विधाने करत असल्याचा आरोप केसीआर यांनी केला आहे.
प्रत्येक एकरला पाणी देता येते-देशाला मोठ्या क्रांतीला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाने विकास केला नाही. योजना दिल्याने राज्याचे दिवाळे निघणार नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दिवाळी होईल. सत्ता जाते-येते. पण विकास महत्त्वाचा आहे. मराठी बोलू शकत नाही पण समजते. शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्याने इतर पक्षांना भीती वाटत आहे. बीआरएस ही एका राज्यापुरती मर्यादित नाही. केंद्र व राज्य सरकारची नीती चांगली असेल तर प्रत्येक एकरला पाणी देता येते. येथील सरकारमध्ये इच्छाशक्ती नाही. संभाजीनगर, सोलापूर, अकोलामध्ये आठ दिवसातून एकदा पाणी येते. कशामुळे पाणी कपात होते. देशाची जलनीती पश्चिम बंगालमध्ये फेकून दिली पाहिजे. पाणी असूनही आपण का वंचित आहोत, असा प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केला आहे.
तुळजाभवनी मंदिरात प्रार्थना करणार-तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) हे त्यांचे मंत्रिमंडळ सहकाऱ्यांसह पंढपुरात 600 वाहनांच्या ताफ्यासह दाखल झाले आहेत. चंद्रशेखर राव यांनी आज विठ्ठलाच्या मंदिरात व्हीआयपी दर्शन घेतले आहे. हेलिकॉप्टरमधून पालखीवर पाकळ्यांचा वर्षाव करण्याची केसीआर यांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. पंढपुरहून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवनी मंदिरात प्रार्थना करणार असल्याचे बीआरएस नेते धोंडगे यांनी सांगितले.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे आज राष्ट्रवादीतून बाहेर पडत के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये शेकडो समर्थकांसह प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्या सरकोली या निवासस्थानी सकाळी दहा वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. भालके यांच्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे स्नेहभोजनही करणार आहेत. केसीआर यांच्या वाहनासोबत जवळपास 600 वाहने असल्याने सोलापूरमध्ये पोलिसांना वाहतूक नियंत्रण करताना दमछाक झाली. सोलापुरात एक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. पंढरपुरातदेखील तेच दृश्य पाहायला मिळण्याची शक्यता आहे.