मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवसेनेनंतर आता मनसेनेही कंगनावर हल्लाबोल केला असून तिच्यावर मानसिक उपचार होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
कंगनाने मुंबई पोलिसांवर केलेल्या ट्विटचा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जाहीर निषेध केला आहे. तसेच मुंबई पोलिसांना निवेदन देऊन कंगना रनौत विरोधात राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी खोपकर यांनी केली आहे. कंगनाच्या डोक्यावर परिणाम झाला असून तिच्यावर मानसिक उपचार होणे गरजेचे असल्याचे खोपकर म्हणाले. सोशल मिडियात पोस्ट टाकून प्रकाशझोतात येण्याच हा विकृत रोग आहे. ज्या मुंबईत येऊन करोडो रुपये कमावले त्या मुंबईला शिव्या घालता त्याची लाज वाटली पाहिजे, अशी टीकादेखील खोपकर यांनी कंगनावर केली.