मुंबई - काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी सोमवारी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त बैठकीला हजेरी लावली. यामुळे आमदार कोळंबकर यांच्या शिवसेना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची जोरदार चर्चा आहे. भाजप शिवसेनेच्या आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये संबोधित केले.
विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त बैठक
आगामी विधानसभा निवडणूक आणि राज्यात असलेल्या दुष्काळाबाबतच्या मार्गदर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असल्याने दोन्ही पक्षाच्या आमदारांना एकत्रित मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले असल्याने आमदारांनी विधानसभा निवडणुकीत बेफिकीर राहू नये . राज्यातला दुष्काळ पाहता प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारसंघात जनतेत मिसळून काम करावे, असे निर्देश दोन्ही नेत्यांनी उपस्थित आमदारांना दिले.
कोणताही मतदारसंघ असला तरी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीची काम करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी यावेळी केले. या बैठकीला केवळ शिवसेना आणि भाजपचे आमदार नाहीत तर मित्र पक्षांचे आमदार आणि मंत्रीही उपस्तिथ होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंत्री सदाभाऊ खोत ही यावेळी उपस्तिथ होते .
महायुतीच्या या मांदियाळीत भाजपच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. वडाळा हा मतदार संघ सध्या शिवसेनेकडे असल्याने कोळंबकर यांची कोंडी झाली होती. तसेच हा मतदार संघ कोळंबकर यांना देण्याबाबतची शाश्वती मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी त्यांना दिली नव्ह्ती. लोकसभा निवडणुकीत कोळंबकर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा उघडपणे प्रचार केला होता. मात्र, त्यांना स्थानिक शिवसैनिकांनी विरोध दर्शविला होता. दरम्यान पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी कोळंबकर यांना पक्षात प्रवेश देणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांनंतर सोमवारच्या बैठकीत कोळंबकर महायुतीच्या बैठकीत दिसल्याने त्यांचा शिवसेना प्रवेश अथवा शिवसेनेकडून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे.