मुंबई :संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. केंद्र सरकारने, राज्य सरकारनेही हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारने तृणधान्य अधिकाधिक आहारात समाविष्ट व्हावीत, तृणधान्य पिकवण्याला चालना मिळावी, तृणधान्याला योग्य हमीभाव मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. याबाबतची माहिती अन्न, पुरवठा विभागाच्या सचिवांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. या धान्यांमध्ये गहू तांदूळ या रोजच्या धान्यांबरोबरच ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा, कुटकी अशा तृणधान्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
तृण धान्याच्या प्रोत्साहनासाठी शिधापत्रिकेवर :सध्या राज्यातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना गहू, तांदूळ हे शिधापत्रिकेवर दिले जातात. सध्या राज्यातील बीपीएलधारक, अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या माध्यमातून सात कोटी शिधापत्रिकाधारकांना दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू दिले जातात. या ऐवजी किंवा याबरोबरच आता ज्वारी, बाजरी शिधापत्रिकेवर देता येईल का याबाबत राज्य सरकार विचार करीत आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार असून त्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती विभागाच्या सचिवांनी दिली आहे. काही वर्षांपासून राज्यातील ज्वारी, बाजरीचे उत्पादन घटले आहे. हे उत्पादन वाढवण्यासाठी ही राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय आहे उत्पादनाचा आलेख? :तृणधान्य पिकांखालील क्षेत्रात मोठी घट होत आहे. 2010 - 11 ते 2020 - 21 या कालावधीत पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र 57% घटले आहे. या कालावधीत उत्पादन 12 टक्के घटले आहे. मात्र, उत्पादकतेत 12 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. खरीप ज्वारी पिकाचे क्षेत्र 80% तर, उत्पादन 87% झाले असून उत्पादकतेत सदतीस टक्के घट झाली आहे. रब्बी ज्वारी पिकाचे क्षेत्र ५३ टक्के उत्पादन 27 टक्के घटले आहे. मात्र, उत्पादकते 55% वाढ झाल्याचे दिसून येते. बाजरी पिकाचे क्षेत्र ५१ टक्के उत्पादन 59 टक्के तर उत्पादकता 17 टक्क्यांनी घटली आहे. नाचणी पिकाखालील क्षेत्र 39 टक्के उत्पादन 21% घटले आहे तथापि उत्पादकतेत 29 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर येते आहे.
पिकांना वाढीव हमीभाव? :या तृणधान्य पिकांना उत्पादन वाढीसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सचिवांनी दिली. त्यामुळे ज्वारीसाठी 73% बाजरीसाठी 65 टक्के आणि नाचणीसाठी 88% इतकी हमीभावात वाढ करण्यात आली आहे. ज्वारीसाठी सन 2017-18 मध्ये प्रतिक्विंटन सतराशे पंचवीस रुपये असलेला भाव 2022 - 23 साठी 2 हजार 990 करण्यात आला आहे बाजरीसाठी चौदाशे पंचवीस वरून 2 हजार 350 रुपये आणि नाचणीसाठी 1 हजार 900 रुपयांवरून 3 हजार 578 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव करण्यात आला आहे.
किती होते लागवड? :राज्यात ज्वारी पिकाचे क्षेत्र सोळा पूर्णांक 37 लाख हेक्टर इतके आहे.
बाजरी पिकाचे क्षेत्र पाच पूर्णांक चार लाख हेक्टर इतके आहे तर नाचणी पिकाचे क्षेत्र 0.77 लाख हेक्टर इतके आहे.