मुंबई : जग्गी वासुदेव (सद्गुरू) यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओवरून सध्या वाद सुरु झाला आहे. 'सद्गुरु यांनी ॲनिमेशन व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती प्रसारित केली आहे. त्यांनी नको त्या विषयात हात घालून एक वाद निर्माण केला आहे. तो वाद ताबडतोब मिटवायला हवा. माझी सद्गुरूंना विनंती आहे की आपण शब्द मागे घेवून महाराष्ट्राची माफी मागावी', अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
जितेंद्र आव्हाडांचे ट्विट : जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये सद्गुरु यांनी व्हिडिओमध्ये कोणते शब्द वापरले याची माहिती दिली आहे. रामदास हे शिवाजींचे गुरु होते. रामदासांना भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले. रामदासांच्या आदेशाने शिवाजी राज्य सोडून हाती कटोरा घेऊन भिक्षा मागू लागले. पुढे रामदासांनी स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र शिवाजींना देऊन त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले, अशा प्रकारचे ॲनिमेशन व्हिडिओ सद्गुरु यांनी प्रसारित केले आहे. हे कुठल्याच इतिहासाच्या जवळपास नाही. आम्ही हे त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे त्यांनी त्या ॲनिमेशन व्हिडिओ मधील वाक्य मागे घ्यावे. उगाच कारण नसताना वाद निर्माण व्हायला नको. आपले शब्द मागे घ्या, असे ट्वीट आव्हाडांनी केले आहे.