मुंबई - आंबेडकरांनी आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा मसूदा द्यावा, सर्व विरोधी पक्षनेते त्यावर हस्ताक्षर करतील. मात्र, त्यांनी महाआघाडीसोबत यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
युतीवर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीवर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, की शनिवारी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणावे हीच प्रमुख मागणी केली आहे. त्यामुळे त्यांनी या मागणीबाबात त्यांच्या मनात जो मसूदा आहे तो आम्हाला द्यावा. महाराष्ट्रातील तमाम समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते त्यावर हस्ताक्षर करतील. कारण आंबेडकर आणि आमचा भारताची लोकशाही वाचवणे, संविधान वाचवणे हा एकच राजकीय उद्देश आहे.
'सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्करांना भाजपच्या आयटी सेलकडून ट्रोल केले जात आहे'
सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्करांना ट्रोल होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, की सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर ज्यांनी भारताला जागतिक स्तरावरील क्रिकेटमध्ये ओळख निर्माण करून दिली. एकाने सरफराज आणि इम्रान खान यांना थोपवले, तर दुसऱ्याने अब्दुल कादिरला वयाच्या १५ व्या वर्षी आणि नंतर शोएब अख्तर आणि वसिम अक्रम यांना मैदानाबाहेर फेकून दिले. अशा या दोघांनाही देशद्रोही म्हणत ट्रोल केले गेले. सचिनच्या ट्विटवर जाऊन पाहिले तर भाजपच्या आयटी सेलने ट्रोल केल्याचे स्पष्ट होते. आज सचिनच्या समर्थनार्थ सौरभ गांगुलीही मैदानात उतरला आहे.
यावेळी आव्हाड यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी याची जबाबदारी घेऊन भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि मराठी माणसाचा अभिमान सुनिल गावस्कर या दोघांचाही अपमान करून महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान केल्याचा आरोप केला. तेंडुलकर आणि गावस्कर यांना कोणीही राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र वाटण्याची गरज नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अमित शाह यांनी देशाची, महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची माफी मागावी, अशीही मागणी केली.