मुंबई- राज्यात निवडणुका झाल्यानंतर आमच्या दोन्ही पक्षाचे राष्ट्रीय नेते एकमेकांना भेटले नव्हते. त्यानिमित्ताने 4 नोव्हेंबर रोजी दिल्ली ते एकमेकांना भेटणार आहेत. या भेटीत प्रामुख्याने महाराष्ट्रात निवडणुका कशा पार पडल्या त्या संदर्भातील आढावा हे नेते घेतील. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या संदर्भात हे दोन्हीही नेते चर्चा करतील, असे मला वाटत नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला.
सिल्वर ओक येथील बंगल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी याविषयीची माहिती दिली.
हेही वाचा - हीच ती वेळ..! शिवसेनेला छगन भुजबळांनी दिला 'हा' सल्ला
पाटील म्हणाले, महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याचा प्रामुख्याने आढावा घेण्यासाठी आजची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील संपूर्ण परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल माहिती घेण्यात आली. तसेच आम्ही जिल्हास्तरावरील माहिती मागवली असून त्याचा वेगळा आढावा सुद्धा घेणार आहोत. स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिक जिल्ह्यात जाऊन आले. त्या पट्ट्यातही शेतकऱ्यांची परिस्थिती भयावह आहे. आम्ही राज्यात जात आहोत. परंतु, राज्य सरकार म्हणून सरकारचे लोक राज्यात गेले नाहीत. त्यामुळे लोकांना मदत करण्यापेक्षा केवळ सत्तेच्या खुर्च्या मिळवण्याचे काम आणि कोणाला किती लाभ मिळेल यासाठी हे सर्व गुंतलेले आल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
हेही वाचा - राष्ट्रपती राजवट ही संविधानातील कायदेशीर प्रक्रिया - आमदार राम कदम
राज्यातील जनतेने सेना-भाजपला राज्यात सरकार स्थापन करण्याचा कौल दिला आहे. परंतु, हे लोक सरकार स्थापन करत नाहीत. केवळ अधिकच्या लाभासाठी यांच्यात वाद सुरू आहेत. निवडणुकीपूर्वी युती करण्यापूर्वी या दोघांनी काहीतरी ठरवले असेल असे मी समजतो. त्यामुळे दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करण्यासाठी विलंब लागण्याचे काहीच कारण नाही. त्यात ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्तेच्या समान वाटपा विषयी बोलतात आणि ते काही खोटे बोलत असतील, असे मला वाटत नाही. त्यामुळे भाजपने त्याची अंमलबजावणी करून हा विषय संपवणे आवश्यक असल्याचे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
उद्या (रविवार) मुंबईत होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीवर विचारले असता पाटील म्हणाले की, या निवडणुकीत आम्ही राज्यभरात 115 पर्यंत जागा लढवल्या. त्यामध्ये आम्हाला ५४ जागांवर यश आले. राज्यात दोन नंबरची मते आमच्या पक्षाला मिळाली. पवार साहेबांच्या मागे राज्यातील संपूर्ण जनता ठामपणे उभे राहीली हे यातून दिसून आले. या निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झाले त्या उमेदवारांना बोलवून घेऊन त्यांचे प्रश्न आणि त्यांचे विषय समजून घेऊन, एका पराभवाने खचून जायचे नसते तर पुढे पुन्हा काम सुरू ठेवायचे असते, असा संदेश आम्ही यातून त्यांना देणार आहोत. पुन्हा उभारी घेऊन कामाला लागण्यासाठी आम्ही त्यांना या बैठकीत मार्गदर्शन करणार आहोत, अशी माहितीही पाटील यांनी दिली.