मुंबई- पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्यासाठी ती बँक महाराष्ट्र सहकारी बँकेत विलिन करण्याचा विचार सुरू आहे. राज्य सरकारतर्फे पीएमसी बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांशी चर्चा सुरू असून या प्रश्नावर लवकरच मार्ग निघेल, अशी आशा महाविकास आघाडीचे मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
पीएमसी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिन करणार - जयंत पाटील - shiv sena
पीएमसी बँकेच्या मागे राज्य सहकारी बँक पाठीशी उभे राहणार असल्याचे पत्र रिझर्व बँकेला देणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत पंजाब महाराष्ट्र बँक विलिन करून त्या माध्यमातून खातेदारांच्या ठेवी परत मिळण्यास मदत होईल. कारण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची अवस्था सध्या चांगली आहे. या दोन्ही बँका एकत्र केल्यास त्यांची आर्थिक पत वाढेल. त्यातून संपूर्ण नाही पण जवळपास ७० ते ८० टक्के कमी ठेवी असणाऱ्या खातेदारांना त्यांच्या ठेवी परत देता येतील, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. त्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांशी संवाद साधला असून त्यांचीही पीएमसी बँकेसोबत चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, मागील महायुतीच्या सरकारने पीएमसी बँकेच्या प्रश्नावर कोणतीही भूमिका घेतली नव्हती. मात्र, आम्ही यासाठी रिझर्व बँकेसोबत संपर्क करून या दोन्ही बँकांचं विलिनीकरण करण्याची विनंती करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यासाठी राज्य सरकार या दोन्ही बँकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना जास्तीत जास्त ठेवी परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. ही प्रक्रिया मोठी असल्याने यासाठी एक ते दीड महिन्याचा कालवधी लागेल, अशी महितीही जयंत पाटील यांनी दिली.