मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. सभागृहात राज्यातील पाऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दररोज चर्चा होत आहे. या चर्चे दरम्यान अनेक सदस्य आपापली मते आक्रमकपणे मांडत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, बोगस बियाण्यांचे प्रश्न, खतांचे प्रश्न सभागृहात माडले जात आहेत. मात्र असे असले तरी सभागृहातील नवीन राजकीय घडामोडींमुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि कटूता ही सातत्याने दिसून येताना पहायला मिळत आहे.
सभागृहात कटूतेचे दर्शन : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप आपला विरोधी पक्ष नेता घोषित केलेला नाही. किंवा महाविकास आघाडीनेही आपला विरोधी पक्ष नेता नेमलेला नाही असे असताना सभागृहातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे विरोधकांच्या वतीने आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि धनंजय मुंडे व अजित पवार यांच्यामध्ये मात्र अधिक कटूता आल्याचे सभागृहात या चर्चे दरम्यान पाहायला मिळत आहे.
लक्षवेधीला कृषी मंत्र्यांचे उत्तर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भातील लक्षवेधीला कृषी मंत्री धनंजय मुंडे सभागृहात उत्तर देत होते. बोगस बियाण्यांसाठी सरकारने कायदा केला आहे. तसेच खतांच्या संदर्भातही कायदा केला असून तीन कंपन्यांवर कारवाई केल्याची माहिती ते सभागृहात देत होते. यावेळी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी उठून हरकत घेतली.